नाशिक Uddhav Thackeray Nashik Sabha : भाजपा सरकारला कोणतंही काम दिसत नाही, त्यामुळं तुम्हाला मतांसाठी रामासह हनुमानाचा आधार घ्यावा लागतो. अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेची घाई का केली? राम नवमीपर्यंत का थांबता आलं नाही, असा आरोप ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला आहे. ते आज नाशिकमध्ये आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्राणप्रतिष्ठा : उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असून काल त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात गोदावरीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान मोदींचा चांगलाच समाचार घेतला. भाजपामधील भ्रष्टाचारी लोकांना मान आहे, शंकराचार्यांना नाही. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपानं राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
शेतकऱ्यांची छाती भारी : 'ते' आमची सुरक्षा काढून घेतात, मात्र स्वत: कडक सुरक्षेत राहतात. तुमच्या 56 इंच छातीपेक्षा आमच्या शेतकर्यांची छाती भारी आहे. आमची सत्ता आल्यावर त्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात घालू असा हल्लाबोल ठाकरेंनी भाजपावर केला आहे. मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. मणिपूरमध्ये दोन जागा आहेत, म्हणून तुम्ही तिकडं जात नाही. महाराष्ट्रात जास्त जागा असल्यामुळं तुम्ही इथं येत आहात. देश के मन की बात, आणि गुजरातची धन की बात मोदी करत असल्याचा हल्लाबोल देखील ठाकरेंनी यावेळी केला.
मोदींचं घाणेरडं राजकारण सुरू आहे. तुम्ही आमचा महाराष्ट्र बरबाद करत आहात. आता आम्ही यासाठी लढू. गुजरातमध्ये क्रिकेटचा अंतिम सामना नसता तर आम्ही जिंकलो असतो. महसूल मिळण्याचे ठिकाणे गुजरातमध्ये घेऊन जात आहे. राहुल नार्वेकरांनी इथं येऊन शिवसेना कोणाची ते सांगावं. शिवसेना संपवून टाकावी असं त्यांना वाटतंय. युती तुटली नसती, तर फडणवीस अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. देशाचं राजकारण हुकूमशाहीकडं जात आहे, असा टोला देखील त्यांनी भाजपाला लगावला.
हेही वाचा -