ठाणे Thane Crime News : लोकसभा निवडणुकीसाठी आता कुठल्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. तसंच राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार टाळावेत या अनुषंगानं निवडणूक आयोगानं पोलिसांना अवैध हत्यारांबाबत कारवाईचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत ठाणे गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकानं सात देशी बनावटीचे पिस्तूल आणि 10 काडतुस बाळगल्याप्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
आरोपीला अटक : ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार ठाणे गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे माणकोली नाका भिवंडी येथे सापळा रचून केलेल्या कारवाईत आरोपी गुरुचरण छबिलसिंग जुनेजा (वय-23, मु.पो. पाचोरी, जि.बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश ) याला अटक करण्यात आली. सात माऊजर पिस्टल आणि 10 जिवंत काडतुस हस्तगत केली आहेत. तर आरोपी गुरुचरण हा शस्त्र विक्रीसाठी अंजूर पेट्रोल पंपाच्या समोर, माणकोली नाका, भिवंडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत आरोपीला अटक करण्यात आली. तर जप्त करण्यात आलेली शस्त्र आरोपी कुणाला विक्री करण्यासाठी किंवा देण्यासाठी आला होता, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. अटक आरोपी गुरुचरण जुनेजा याच्यावर नारपोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्रसाठा हस्तगत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशमध्ये अनेक अवैध कारखाने : मध्यप्रदेशमधील बुऱ्हाणपूर हा देशातील अनेक अवैध हत्यारं बनवण्याचे कारखाना असलेला भाग आहे. इथं मोठ्या प्रमाणात हत्यारं बनवली जातात. त्यांची विक्री संपूर्ण देशभरात होते. यासंदर्भात ठाणे पोलिसांनी यापूर्वी बुऱ्हाणपूर येथील पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून माहिती दिली होती. आता पुन्हा हाच प्रकार समोर आल्यानं याबाबत पुन्हा ठाणे पोलीस पत्र व्यवहार करणार आहेत.
हेही वाचा -