पुणे Supriya Sule : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विविध घडामोडी घडताना पहायाला मिळत आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्या दृष्टीनं एकाच कुटुंबातील दोन्ही नेत्यांकडून तयारी तसंच तसा प्रचारही केला जातोय. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दमदाटीबाबत थेट सांगितलं होतं. असं असताना बारामतीतदेखील दबाव आणलं जात असल्याचा दावा केला जात आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार सुरक्षा मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलंय.
काय लिहिलंय पत्रात : सुप्रिया सुळे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. ते दोघंही घटनात्मक, शांतपणे आणि लोकशाही मार्गानं लोकांशी संवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आलीय. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंवैधानिक आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
तातडीनं सुरक्षा पुरवावी : सुसंस्कृत व विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळं आपणाकडून रोहित पवार व युगेद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीनं पुरविण्यात यावी, ही विनंती सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण अधीक्षकांकडे या पत्राद्वारे केलीय.
हेही वाचा :