मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं महायुतीला भरघोस मतदान करून एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिली. अशात निवडणुकीचा निकाल लागून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून ६ दिवस झाले तरी मुख्यमंत्री पदाचा पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींच्या हाती सोपवला आहे. अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित मानलं जात असलं तरी, यापूर्वीचा मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील मुख्यमंत्री पदाबाबत भाजपाचा अनुभव बघता ऐन वेळेवर भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी इतर कुणाला मुख्यमंत्री पदी बसवू शकतं, अशीही शक्यता निर्माण झालीय.
मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये आश्चर्यकारक निर्णय : विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं एकहाती कौल देऊन पुन्हा सरकार स्थापनेची संधी दिली. ही विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. त्यामुळं पुन्हा मुख्यमंत्रीपदी ते विराजमान होतील अशी चर्चा होती. परंतु मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून ते बाहेर असल्याचे संकेत त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन दिले. त्यामुळं राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होणार अशीच शक्यता आता जास्त आहे. त्यात ज्यांच्या करिष्म्याने राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळालं ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात अग्रस्थानी आहे. असं असलं तरी भाजपाचा पूर्व इतिहास पाहता हे नाव शेवटच्या क्षणी बदललं जाण्याचीही शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. यापूर्वी झालेल्या मध्यप्रदेशच्या निवडणुकीत भाजपामधील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण सारख्या दिग्गज नेत्यांना झटका देत भाजपाने ओबीसी नेते मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. तसंच राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असताना, भाजपानं भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता.
विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा : देवेंद्र फडणवीस यांच्या जागी अनेक नावं चर्चेत आहेत. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस महाराष्ट्रातील मोठे नेते मराठा समाजाचे विनोद तावडे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. विनोद तावडे हे मराठा समाजाचे असल्याकारणानं राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यांची असलेली जवळीक पाहता विनोद तावडे यांचं नाव अचानक मुख्यमंत्री पदासाठी येऊ शकतं. विशेष म्हणजे दिल्लीत मुख्यमंत्री पदाबाबत गुरुवारी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि दोन माजी उपमुख्यमंत्री यांची भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा होण्यापूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बुधवारी रात्री अचानक दिल्लीला बोलावून त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. विनोद तावडे यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांच्याही नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. ओबीसींचं राजकारण करून राज्यात सत्तेत आलेल्या भाजपासमोर आता मुख्यमंत्री कोणाला करावं? याबाबत अजूनही संभ्रम असू शकतो. असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
राजकारणात काहीही होऊ शकतं : राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांच्या मते, "राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जो काही भरघोस प्रतिसाद मिळाला त्या कारणानं महायुतीला महिलांनी भरघोस मतदान केलं. महायुतीच्या विजयासाठी लाडक्या बहिणींच्या वाढीव मताचा टक्का फायदाचा ठरला. अशाप्रसंगी भाजपाकडून राज्यात महिला मुख्यमंत्री सुद्धा विराजमान होऊ शकते. याकरता भाजपा नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा यापूर्वी भाजपाने वेगळे प्रयोग केले आहेत".
मुख्यमंत्री पदासाठी ७० टक्के भाजपा नेत्यांचा पाठिंबा : याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक, विजय चोरमारे पुढे म्हणाले, "भाजपा पक्षश्रेष्ठी विशेष करून अमित शाह यांच्या मनात काय सुरू आहे, हे कुणी सांगू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने राज्यात कमबॅक केला आहे ते पाहता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर लोटणं हे भाजपाला परवडणार नाही. राज्यातील जवळपास ७० टक्के भाजपा नेत्यांचा पाठिंबा मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना आहे. परंतु राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. या कारणाने जोपर्यंत भाजपाचा विधिमंडळ गटनेता निवडला जात नाही, तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या नावावर अनिश्चितता असणार आहे", असंही विजय चोरमारे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -