नागपूर Natural Farming on Building Teres: शहरी जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळं जिकडं-तिकडं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. रोजच्या आहारातील प्रत्येक घटकचं आता विषारी रासायनिक झाला आहे. त्यामुळं कळत-नकळत हजारो रुपये रुग्णालय आणि औषधांवर खर्च केले जातात. ही समस्या दरवर्षी वाढतचं जाणार आहे. त्यामुळं या समस्येवर उपाय म्हणून नागपूरच्या एका गृहस्थानं चक्क अपार्टमेंटच्या छतावर 'जैविक शेतीचा' यशस्वी प्रयोग (Organic Farming) करून दाखवला आहे.
घराच्या छतावरच जैविक शेती : श्रीपत राठोड यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री आणि दोन्ही मुली देखील या जैविक शेतीसाठी काम करतात. राठोड यांचं हे कुटुंब गेल्या दोन दशकांपासून जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग करत आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून ते नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला भाजीपाला आणि फळे आहारात खातात. त्यामुळं गेल्या दहा वर्षात या कुटुंबानं ताप, सर्दी, खोकला या सारख्या किरकोळ आजारावर 5 हजार रुपये देखील खर्च केलेला नाही. त्यामुळं निरोगी आयुष्य जगायचं असेल तर नैसर्गिक फळे आणि भाज्याचा उपयोग हा किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध होतय.
छतावरच फुलवली 'परसबाग' : श्रीपत राठोड आणि त्यांचं कुटुंब मनीषनगर येथे गेल्या 10 वर्षापासून वास्तव्यास आहे. यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे राहायचे. तिथे देखील त्यांनी अशाच प्रकारच्या जैविक पद्धतीचा अवलंब करून घरात परसबाग फुलवली होती. नागपूरला राहण्यासाठी आल्यानंतरही जैविक शेतीची गोडी त्यांना स्वस्थ बसू देत नसल्यानं त्यांनी अपार्टमेंटच्या छतावरचं जैविक शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला. आज या प्रयोगाला दहा वर्षे पूर्ण झाली. आता या शेतीचं रूपांतर समृद्ध 'परसबागेत' झालं आहे.
आर्थिक बचत, विषमुक्त शरीर, हीच खरी कमाई : आजकाल जिकडं-तिकडं रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रभाव असलेल्या भाजीपाला, फळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळं गंभीर आजार तर होतो, शिवाय आरोग्यावर विपरित परिणाम नेहमीच होत असतो. यावर उपाय शोधताना श्रीपत राठोड आणि त्यांच्या कुटुंबानं जैविक शेतीच्या यशस्वी प्रयोगातून आर्थिक बचत तर केलीचं आहे, शिवाय परिवाराला बाराही महिने ताज्या भाजीपाला खावू घालून आरोग्यही ठणठणीत ठेवलं आहे. ही अनोखी परसबाग नागपुरात चर्चेचा विषय ठरत आहे.
कामात कुटुंबाची साथ महत्वाची : दिवसागणिक बदलणारे वातावरण आणि शहरातील प्रदूषित हवामानामुळं शहरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला महिन्या दोन महिन्यात आजारपणावर आणि त्याच्या उपचारावर हजारो-लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी श्रीपत राठोड यांनी अपार्टमेंटच्या छतावर फुलवलेल्या नैसर्गिक शेतीत श्रीपत राठोड यांची पत्नी जयश्री आणि मुली दीपाली तसंच अंजली देखील वेळात वेळ काढून काम करतात. त्यामुळं त्यांची साथ देखील अत्यंत महत्त्वाची आहे.
अशी एकही भाजी नाही जी इथे नाही : सामाजिक कार्यकर्ते असलेले श्रीपत राठोड यांना जैविक शेतीची आवड आहे. ते चार मजली अपार्टमेंटमध्ये राहतात. येथे पुरेशी जमीन किंवा जागा उपलब्ध नसल्यानं त्यांनी अपार्टमेंटच्या छतावर विविध प्रकारची झाडे लावली. आजच्या घडीला त्यांच्या परसबागेत तब्बल 70 प्रकारच्या विविध आरोग्यदायी भाज्या, फळे आहेत. यात कोथिंबीर, पालक, मेथी, कारले, दोडके यांचा समावेश आहे. रानभाज्यापासून ते गवती चहा आणि विड्याच्या पानापर्यंत सर्वच हंगामी पिके येथे पिकवली जातात. अशी एकही भाजी नाही, जी तुम्हाला येथे पाहायला मिळणार नाही. परिवारातील सर्व सदस्य मुलाप्रमाणे परसबागेची काळजी घेतात. शेणखत आणि जैविक खताचा उपयोग करून सुरूवातीला गुंतवलेल्या अवघ्या 10-20 हजारांत ही परसबाग तयार झाल्याचं श्रीपत राठोड यांनी सांगितलं.
वर्षाला 30 हजारांची बचत : माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावानं साकारलेल्या या परसबागेतून राठोड परिवाराला बाराही महिने ताजा आरोग्यदायी भाजीपाला मिळतो. दरवर्षी 30 हजारांच्या भाजीपाल्याची बचत होते. अत्यंत कमी खर्चातील या परसबागेपासून प्रेरणा घेत शहरातील इतरही नागरिकांनी आपल्या घरी छोटीशी बाग तयार करून परिवाराचे आरोग्य सुदृढ ठेवावे, असं आवाहन राठोड यांनी केलय.
हेही वाचा -
- नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी वर्षभरात पिकवला २८ लाख ६० हजारांचा शेतमाल - Nagpur Central Jail Story
- आयटीचा जॉब सोडून तरुण वळला शेतीकडं; पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या शेतीतून कमवतोय लाखो रुपये - White Jamun Farming
- मेळघाटातील शेतकऱ्याला आधुनिक शेतीचा ध्यास; अडीच एकर पैकी अर्धा एकरमध्ये खोदले शेततळे - Shettale In Melghat