कोल्हापूर Shivsena National Convention : कोल्हापुरातील गांधी मैदानावर शनिवारी जाहीर सभेने या दोन दिवसीय अधिवेशनाची सांगता होणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 'यायला लागतंय' या टॅगलाईन खाली शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी होत आहे. शुक्रवारी सकाळी नाव नोंदणीपासून या अधिवेशनाला प्रारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन मुख्य राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. दिवसभरात चार सत्रात होणाऱ्या अधिवेशनात संघटनात्मक विषय, राजकीय विषय आणि सरकारी योजनेची कार्यशाळा होणार आहे.
असं असेल कार्यक्रमाचं नियोजन: पहिल्या दिवसाची सांगता स्नेहभोजनानं होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकसभा सदस्य, पदाधिकारी, करवीर निवासिनी आई अंबाबाईचे शनिवारी दर्शन घेणार आहेत. यानंतर अधिवेशनस्थळी पहिल्या सत्रात निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षणाने राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता होणार आहे. सायंकाळी कोल्हापूर सह राज्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत गांधी मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला लाखो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रीय महाअधिवेशनाचे संयोजक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार: आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणी आणि निवडणूक कार्यक्रम पदाधिकारी कार्यकर्त्यांना या राष्ट्रीय अधिवेशनातून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना या राष्ट्रीय अधिवेशनातून कोणता कानमंत्र देतात? यासह याच अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार असल्यानं या अधिवेशनाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील नऊ मंत्री आणि लोकसभा सदस्य या राष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे, याबाबतचा आढावा पोलीस अधीक्षक पंडित यांनी अधिवेशनस्थळी घेतला.
बॅनर, फ्लेक्स आणि झेंड्यांनी शहर बनलं भगवमय : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात शिवसेना शिंदे गटाचे बॅनर फ्लेक्स, शिवसेनेचे झेंडे लावण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील सुमारे 100 हून अधिक हॉटेलमधील 2 हजारहून अधिक खोल्यांची बुकिंग शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच दोन दिवस कोल्हापुरात असणार आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, आमदार, खासदार उपनेते संपर्क नेते जिल्हाप्रमुखसुद्धा उपस्थित असणार आहेत. त्यांना राहण्यासाठी हॉटेल बुक करण्यात आले असून शहरात पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा:
- मनोज जरांगेंची तब्येत खालावली, मराठा आरक्षणाकरिता संतप्त आंदोलकांचा धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको
- सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक का ठरवले? जाणून घ्या या 7 महत्वाची कारणं, 13 मार्चला व्यवहारांची माहिती मिळणार
- मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकारला चिंता, वैद्यकीय तपासणी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश