मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केलीय, या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुरोगामी विचारांच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची फौज उभी करत केडर पातळीवर वेगळी बांधणी सुरू केलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीला हा शह असल्याचे भारत जोडो अभियानाच्या नेत्या अर्चना ताजणे यांनी सांगितलंय.
महायुती व महाविकास आघाडीतील संघर्ष शिगेला : येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळणार आहे. महायुतीतील मुख्य घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत जाळे पसरवले असून, यावेळी मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे जाण्याचा प्रयत्न भाजपा या निमित्ताने करणार आहे. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेकडून मिळालेला पाठिंबा विधानसभा निवडणुकीतही मिळण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बदलला चेहरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा चेहरामोहरा बदललाय. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि आमचं हिंदुत्व जाणव्याचं नाही, ही भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी हातमिळवणी केली आणि आता पुरोगामी विचारांच्या संघटनाशी त्यांनी जुळवून घेतलंय. म्हणूनच पुरोगामी विचारांच्या संघटनांचे जाळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरप्रमाणे करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारत जोडोची शिवसेनेला साथ : यासंदर्भात बोलताना भारत जोडो अभियानाच्या नेत्या अर्चना ताजने म्हणाल्या की, आम्ही राज्यातील पुरोगामी आणि समाजवादी विचारांच्या संघटनांनी लोकांपर्यंत जाऊन सनातनी आणि प्रतिगामी विचारांच्या शक्तींना आवर घालण्याचे आवाहन करrत आहोत. कोणत्याही एका राजकीय पक्षाला थेट मदत असं न म्हणता आम्ही पुरोगामी विचारांच्या पक्षांना मदत होईल, यासाठी वातावरणनिर्मिती करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. राज्यभरात भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांचं जाळे तयार केलं असून, या माध्यमातून केडर स्तरावर आम्ही काम करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम निश्चित दिसेल, असा दावाही त्यांनी केलाय. देशातील एकूणच धर्मांध परिस्थिती आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांना वेळीच रोखण्यासाठी आताच पावले उचलण्याची गरज आहेत, त्यासाठी समाजातील बुद्धिजीवी आणि अन्य विचारवंतांना सोबत घेऊन आम्ही जात आहोत. यामध्ये तुषार गांधी, उल्का महाजन यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -