पुणे : देशात सध्या राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. उद्या गुरुवार (दि. 15 फेब्रुवारी)रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, सध्या राज्यातही राजकीय वादळ आलेलं आहे. काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यानंतर काल काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर आज बुधवार (दि. 14 फेब्रुवारी)रोजी शरद पवारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. तसंच, शरद पवार आपला आमदार खादारांचा गट काँग्रेस पक्षात विलीन करणार आहेत अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेसमध्ये विलीन होणार : शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ सुरू झालीय. शरद पवार गटाकडूनही या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं. पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र, अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत झाली आहे, असं मंगलदास बांदल म्हणाले आहेत.
शरद पवार गटाची पुण्यात बैठक : सध्या शरद पवार लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नसल्यानेही उलट-सुलट चर्चा सुरू होती.
काँग्रेसमध्येही बंडाळी : देशात लवकरच लोकसभा आणि त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातून गेलं आहे. मागच्या दोन दिवसांत काँग्रेसमध्येही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काम करणाऱ्या मोठ्या नेत्यांनी पक्षाला राम-राम करत भाजपाशी घरोबा केलाय. कालच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. तर, काँग्रेसचे आणखी काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी दरी निर्माण झाल्याची स्थिती आहे.
हेही वाचा :
1 मराठा आरक्षण आंदोलन; सकल मराठा समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक, जालन्यात टायर जाळले
2 राज्यसभा निवडणूक! महायुतीच्या नेत्यांची रात्री 'खलबतं', तर काँग्रेसकडून आमदारांची जुळवाजुळव
3 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी वाढली; विमानांच्या उड्डाण संख्येत होणार 'इतकी' कपात