हैदराबाद Scorching Sun : विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. अनेक ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. तेलंगणातही तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. सध्या हवामान कोरडं आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळं नागरिकांनी उन्हात बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय.
काय काळजी घ्याल : हवामान खात्याच्या तापमान वाढीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या आरोग्य विभागानं नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय. तसंच ज्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त असते, अशा वेळी अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या शीतपेयांपासून दूर राहण्याचंही आवाहन केलंय. ते शरीराला निर्जलीकरण करतात असं म्हणतात म्हणून पिऊ नये असं सांगण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून, सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष बेड, द्रवपदार्थ आणि औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
अनेक भागात तापमान जास्त : अशीच स्थिती राहिल्यास यंदा देशभरात सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाचं (आयएमडी) म्हणणं आहे. उन्हाचा प्रभाव विशेषतः मध्य आणि पश्चिम भारतात अधिक जाणवेल, अशी अपेक्षा आहे. देशातील अनेक भागांमध्ये एप्रिल ते जून दरम्यान सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे. मैदानी भागात नेहमीपेक्षा अधिक दिवस तापमामात वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्माघातापासून कसा बचाव कराल : एप्रिल आणि मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागांत उष्णतेच्या लाटा येऊ शकतील, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळं उष्माघात होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण गरजेचं आहे. यापासून बचावासाठी उन्हाळ्यात पुरेसं पाणी प्या. प्रवास करताना पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचं, फिकट रंगाचं, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी / हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीनं घर थंड ठेवा.
हेही वाचा :