पुणे Savitribai Phule Pune University Dispute : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या नाटकात माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा अपमान केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला. त्यामुळं विद्यापीठात तणावपूर्वक वातावरण बघायला मिळाले. यावेळी अभाविप कार्यकर्त्यांकडून नाटकातील कलाकारांना मारहाणही करण्यात आली. तसंच याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर आजही (3 फेब्रुवारी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. या सर्व प्रकरणावर आता कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली आहे.
योग्य ती कारवाई होणार : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना डॉ. सुरेश गोसावी म्हणाले की, "काल झालेल्या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली जात असून प्रशासकीय स्तरावर त्याची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कधीही कुठल्या धर्माच्या भावना दुखावेल अशा कार्यक्रमांना परवानगी देत नाही, आणि ते होऊही देत नाही. परंतु काल झालेल्या घटनेची आम्ही गांभीर्यानं घेतली असून आम्ही योग्य ती कारवाई करू."
वादाचं कारण काय : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी (2 फेब्रुवारी) एका नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित या नाटकाचं नाव ''जब वी मेट'' होतं. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर नाटकांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची भूमिका विदूषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याचबरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला. तसंच यावरून मोठा झाल्याचं बघायला मिळालं.
अटक केलेल्यांना न्यायालयात हजर करणार : यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसंच याप्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रविण दत्तात्रय भोळे, भावेश पाटील, जप पेदगेकर, प्रथमेश सावत, ऋषिकेश दळवी सह अजून एकाला अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
विद्यापीठाने नेमली समिती - या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसंच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत आहे. सदर प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात विहित नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असं विद्यापीठाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा -