पुणे Third Alliance In Maharashtra : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे महायुतीतून बाहेर पडले आहेत. त्यांनी तिसऱ्या आघाडीची शुक्रवारी पुण्यात घोषणा केली आहे. ही आघाडी परिवर्तन महाशक्ती असणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
तिसऱ्या आघाडीचं नाव ठरलं : पुण्याच्या व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शंकरराव धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ : यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती म्हणाले की "महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक आणि छोट्या गावांना खुर्द म्हटलं जायचं तशीच शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. आमच्या या परिवर्तन महाशक्तीमध्ये येण्यासाठी आम्ही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. त्यांनी देखील आमच्या या आघाडीच्या सोबत यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं यावेळी त्यांनी सांगितलं.
आमदार बच्चू कडूंचा महायुतीला दणका : यावेळी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू म्हणाले की, "आजच्या बैठकीत आघाडीला काय नाव देण्यात यावं, याबाबत चर्चा झाली आहे. सकारात्मक बैठकीत आम्ही आमच्या या आघाडीला 'परिवर्तन महाशक्ती' असं नाव दिलं आहे. येत्या 26 तारखेला संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अजून काही नेत्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. समविचारी लोकांना एकत्रित घेऊन राज्यातील 288 जागांवर आम्ही आमचे उमेदवार लढवणार आहोत," असं यावेळी बच्चू कडू म्हणाले.
महायुतीतून बाहेर पडल्याचं स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का ? : महायुतीतून बाहेर पडला का, असं यावेळी बच्चू कडू यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, कमी महायुतीत बाहेर पडलो आहे ते ?. संभाजीनगरमध्ये आम्ही जे आंदोलन केलं, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणून आम्ही महायुतीतून बाहेर पडलो आहोत," असं यावेळी बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्राचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर नाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हटले की, "महाराष्ट्राच्या राजकारणाचा सातबारा कोणत्याही पक्षाच्या नावावर केलेला नाही. 'परिवर्तन महाशक्ती'चं नेतृत्व सामूहिक असेल. आमच्या जवळ विचारांचा आणि मुद्द्यांचा अजेंडा आहे. ज्या पक्षांना आणि संघटनांना आमच्या परिवर्तन महाशक्तीमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांच्यासाठी आमची दारं उघडे असतील. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा लक्षात घेता, प्रस्थापित आघाड्यांना एक आश्वासक पर्याय देण्याचा निर्णय आणि निश्चय आजच्या बैठकीत झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चांगलं काम करून दाखवतील, असा विश्वास आहे."
हेही वाचा :
- MLA Bachu Kadu Image आमदार बच्चू कडूंच्या प्रतिमेला तृतीयपंथीयांनी मारले जोडे, जाणून घ्या सत्य
- 'वंचित'चा तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न! पुण्यातून वसंत मोरे उमेदवार? प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट - Third Alliance in Maharashtra
- "तिसरी आघाडी नाही, बच्चू कडू अकेलाही काफी"...; आमदार बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण - Vidhan Sabha Election 2024