छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या सणाला फटाके जपून वाजवा असं आवाहन केलं जात असलं तरी अनेक जण बेजबाबदार पणानं फटाक्यांची आतिषबाजी करताना आढळून येतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. उडालेल्या फटक्यानं चालत्या रिक्षाला आग लागली. या आगीत रिक्षा जळून खाक झाला. वाळूज भागात स्टेशनरी विक्री करणाऱ्या दुकानाला आग लागली तर फटाके फोडताना जवळपास 34 जण भाजले असून त्यांच्या पैकी 20 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
रिक्षानं घेतला पेट : शुक्रवारी सर्वत्र लक्ष्मीपूजन थाटामाटात पार पडलं. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी झाली. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक फटाक्यांची प्रचिती आली. दरम्यान काही युवकांनी मात्र सार्वजनिक रहदारी असलेल्या ठिकाणी फटाके वाजवले. उडालेल्या फटाक्यामुळे धावत्या रिक्षानं पेट घेतल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस परिसरातील घडली. घटना लक्षात येताच परिसरातील व्यावसायिकांनी पाण्यानं आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं जीवितहानी टळली असली, तरी आगीत संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. फटाक्यामुळे आग लागली असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली.
वाळूजमध्ये कंपनीला आग : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज उद्योगनगरीतील इंडस्ट्रियल साहित्याची विक्री करणाऱ्या श्री बालाजी स्टेशनर्स अँण्ड इंडस्ट्रियल सप्लायर्स या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानातील स्टेशनरी साहित्य जळून भस्मसात झाले असून जवळपास 5 लाखाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र फटाक्यामुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
शहरात फटाक्यामुळे भाजले 34 जण : दिवाळीनिमित्त फटाके फोडताना 34 जण भाजल्याच्या घटना घडल्या. अनेकांचा घात फुसक्या फटाक्यांनी केला. अनारचा स्फोट झाल्यानं एका 12 वर्षांच्या मुलाचा डोळा निकामी झाला, तर सुतळी बॉम्ब हातात फुटल्यानं एकाचा पूर्ण हात भाजला. बहुतांश रुग्ण 10 टक्क्यांपर्यंत भाजलेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात दिवाळी साजरी झाली. फटाके फोडताना अनेकांना फुसक्या फटाक्यांमुळे इजा झाली. शुक्रवारी तब्बल 34 जण भाजले. घाटी रुग्णालयाच्या जळीत विभागात 14 रुग्ण तर खासगी रुग्णालयात इतर रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
हेही वाचा :