पुणे Dhangekar warned Shambhuraj Desai : आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी पुण्यातील पब संस्कृतीबाबत वस्तूस्थिती मांडली आहे. जे लोक या पब संस्कृतीला मोठं करत आहे अशा लोकांवर मंत्री शंभूराज देसाई यांनी कारवाई करायला पाहिजे. मी जे काही बोललं आहे ते जर त्यांना चुकीचं वाटत असेल तर त्यांनी हे सिद्ध करावं आणि माझ्यावर हक्कभंगाची कारवाई करावी. माझं पुणे सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी माझ्यावर कारवाई केली तर पुणेकरांसाठी मी शिक्षा भोगायलाही तयार असल्याचं यावेळी धंगेकर म्हणाले.
हप्तेखोरीची यादी वाचवून दाखवली : पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मुद्यावरुन काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर 28 मे, 2024 रोजी धडक मोर्चा काढला आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या समोरच हप्तेखोरीची यादी वाचवून दाखवली. यानंतर चरणसिंग राजपूत यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
अधिकाऱ्यांची नावे दाखवली वाचून : आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीनं दर महिन्याला ७० ते ८० लाख रुपये हप्ता घेत असून, हप्ते घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची नावे देखील वाचून दाखवली. "कॉन्स्टेबल सागर सुर्वे, समीर पडवळ, तात्या शिंदे, स्वप्नील दरेकर, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात असा आरोप यावेळी धंगेकरांनी केला."
आरोपात कोणतंही तथ्य नाही : याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत म्हणाले की, वर्षभरात बेकायदेशीर पब आणि बारवर 4 हजारहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी परवानगी घेतली आहे अशा पब आणि बारबाबत वेळेचे नियोजन, त्यांना घालून दिलेल्या नियम आणि अटी ते मान्य करतात का? याबाबत देखील पथकाद्वारे तपासणी करून कारवाई केली जाते. जे काही आरोप करण्यात आले आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही. जर असं काही असेल तर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी राजपूत यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा :