मुंबई Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. अशा परिस्थितीत भाजपाकडून 3 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक, अजित पवारय यांच्या राष्ट्रावादीकडून एक, काँग्रेसतर्फे एक, अपक्ष असं एकंदरीत 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानं बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यातील राजकीय उलथापालथीमध्ये भाजपाकडून चौथा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अचानक अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं निवडणुकीतील रंगत कायम आहे. अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या 10 आमदारांचा पाठिंबा आहे की नाही, हे अजून गुलदस्त्यात आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहील की, बाद होईल यावरही प्रश्न निर्माण झाला आहे.
6 जागांसाठी 7 उमेदवार : .आज भाजपाकडून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच एकनाथ शिंदे गटाकडून मिलिंद देवरा, अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे विधानसभेतील राजकीय पक्षांची सध्याची संख्या पाहता भाजपाचे 3, शिंदे गटाचा 1, अजित पवार गटाचा 1, काँग्रेसचा 1 असे सहा उमेदवार सहज विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं निवडणूक रंजक होण्याची चिन्हे आहेत. राज्यात नाट्यमय सत्ता परिवर्तनानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार गटला राज्यसभेतील उमेदवार गमवावा लागला आहे. अशोक चव्हाण काँग्रेससोडून भाजपामध्ये गेल्यानं काँग्रेसमधील काही आमदार उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांच्या गटातील आमदार फुटतील अशी शक्यता होती. मात्र, भाजपानं चौथा उमेदवार देणास नकार नकार दिल्यानं ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या प्रतिक्रिया भाजपा नेत्यांकडून देण्यात आल्या. अशा स्थितीत अनपेक्षित 7 व्या उमेदवारी अर्जामुळे या निवडणुकीचा ताण कायम आहे.
संख्याबळानुसार उमेदवार दिले : याबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानसभेतील संख्याबळानुसार आमच्याकडं 3 उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे. शिंदे गटाकडं 2 उमेदवार, अजित पवार गटाकडं 1 उमेदवार निवडून आणण्याची क्षमता आहे. तसंच काँग्रेसकडं 1 उमेदवार निवडून येईल इतकी क्षमता असल्यानं ही निवडणूक आम्ही बिनविरोध केली आहे. तसंच या निवडणुकीविषयी बोलताना भाजपा उमेदवार डॉ. अजित गोपछडे म्हणाले, भाजपा पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास सार्थकी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार की नाही : यापूर्वी जून 2022 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं होतं. भाजपाकडं त्यांचे उमेदवार धनंजय महाडिक यांना विजयी करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसताना सुद्धा धनंजय महाडिक यांना पहिल्या पसंती पेक्षा जास्त मतं भेटल्यानं त्यांचा विजय झाला होता. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. महाविकास आघाडीसोबत असलेल्या आमदारांना फोडण्यात भाजपाला यश आलं होतं. तेव्हा भाजपाला त्यांच्या हक्काच्या 106 मतांशिवाय 17 अधिकची मतं मिळविण्यात यश आलं होतं. या सर्व खेळी मागं देवेंद्र फडवणीस यांचा गेम प्लॅन असल्याचं सर्वांना माहित आहे. या निवडणुकीतील विजयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, "निवडणूक फक्त लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती". त्याच पद्धतीची पुनरावृत्ती भाजपा पुन्हा एकदा करेल, अशी या निवडणुकीत अपेक्षा होती. परंतु भाजपानं यंदा आस्ते कदम घेत एक पाऊल मागं टाकलं असताना विश्वास जगताप यांच्या उमेदवारी अर्जानं एक नवीन खेळी समोर येईल का? अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
'हे' वाचलंत :