अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथं शुक्रवारी (25 ऑक्टोबर) रात्री सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड व जाळपोळ झाली होती. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (27 ऑक्टोबर) संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थोरात यांची कन्या जयश्री यांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या आरोपांची उत्तरं दिली.
जयश्री थोरातांनी यात पडू नये : "जयश्री थोरात लहान आहेत, त्यांना अजून बरंच काही शिकायचं, त्यांनी यात पडू नये. आम्ही माफी मागावी असं जयश्री थोरात म्हणत आहेत. आमच्या गाडीतील महिला कार्यकर्तांना मारहाण झाली, याबद्धल त्यांचे वडील बाळासाहेब थोरात माफी मागणार का?" असा थेट सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. "संगमनेर तालुक्यात राजकीय दहशतवाद निर्माण केले जात असून स्वतःला सुसंस्कृत म्हणतात आणि जाळपोळ करतात ही तुमची कोणती संस्कृती आहे," असा टोला राधाकृष्ण विखेंनी थोरतांना लागवलाय.
अर्ध्या तासात गुंड जमा : "संगमनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण यासंदर्भात आपण विचार केला पाहिजे. सगळे मिळून तुम्ही या दहशतवादाविरोधात भुमिका घेत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथं सभेत वसंत देशमुख जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो. सभा झाल्यानंतर सुजय विखेंवर प्राणघातक हल्ला करण्याच्या कटाचा मास्टमाईंड कोण? सभा झाल्यानंतर अर्ध्या तासात गुंड जमा होतात. त्यामुळं हे षडयंत्र असून सुजय विखेंना मारण्याचा डाव होता," असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर केलाय. स्वतःला सभ्य म्हणुन राज्यात फिरायचं आणि इकडे दहशत निर्माण करायची, ही कोणती संस्कृती असा थेट सवाल राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरतांना केलाय.
आता गाठ माझ्याशी : "आम्ही महिलांबद्दल कधीच वाईट बोललो नाही. तूम्ही या घटनेचं राजकारण करून आम्हाला बदनाम करत आहात. तालुक्यातील दहशत आपल्याला संपवायची आहे. आमच्या मतदार संघात येवूून आम्हाला शिवा देताय ही तुमची कोणती संस्कृती आहे. आता गाठ माझ्याशी आहे," अशा शब्दात राधाकृष्ण विखे यांनी थोरातांवर पलटवार केलाय.
महायुती सरकारची किमया : "आज संगमनेर तालुक्यात तुम्ही सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण करत आहात. सर्व कंत्राटदार बोक्यासारखे फुगले आहेत. त्यांचा बंदोबस्त मी करेन, तुम्ही काळजी करू नका. महाविकास आघाडीनं अडीच वर्षांत कोणत्या योजना राबवल्या, हे त्यांनी सांगावं. संगमनेर तालुक्यासाठी महायुती सरकारनं सहाशे आडोतीस कोटी रूपये दिलेत. ही महायुती सरकारची किमया आहे," असं राधाकृष्ण विखे यावेळी म्हणाले.
राज्यभर आमची बदनामी करण्याचा प्रयत्न : "सुजय विखेंना तालुका बंदची कोणी भाषा करत असेल, तर मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही तालुका बंदी करून दाखवाच, जशास तसं उत्तर दिलं जाईल. राज्यभर आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय," असं राधाकृष्ण विखे म्हणालेत.
हेही वाचा