सातारा Pune Hit And Run Case : दारूच्या नशेत पोर्शे कारनं दुचाकीला उडवून दुचाकीवरील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करताना अडचणीत आलेल्या बिल्डरनं महाबळेश्वरातही प्रताप केलाय. लीजवर घेतलेल्या शासकीय मिळकतीवरच त्यानं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचं प्रकरण समोर आलंय. याविरोधात अनेकांनी महाबळेश्वर नगरपालिकेकडं तक्रारी देखील केल्या आहेत.
हॉटेलचं नियमबाह्य बांधकाम झाल्याच्या तक्रारी : महाबळेश्वरमध्ये अल्पवयीन आरोपीच्या वडिलानं शासकीय मिळकत भाड्यानं घेऊन त्यावर फाईव्हस्टार हॉटेल बांधलंय. शासकीय नियम धाब्यावर बसवून हॉटेलचं बांधकाम करण्यात आल्याच्या तक्रारी माहिती अधिकार कार्यकर्त्यासह अनेकांनी नगरपालिकेकडं केल्या आहेत. मात्र, पालिका प्रशासनाकडून त्यावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. हॉटेलमध्ये एक बारदेखील आहे. तसंच हे हॉटेल भाडेतत्वावर देण्यात आलंय. दारूच्या नशेत कार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्याच्या हॉटेलात बेकायदेशीर बार कसा सुरु आहे, असा सवाल महाबळेश्वरमधील नागरिकांनी केला आहे.
खातरजमा करून कारवाई करू : महाबळेश्वरमध्ये लीज नंबर 233 ही मिळकत अल्पवयीन आरोपीच्या वडिलाच्या नावे झालीय. तसंच त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा मिळकतीमध्ये नावं आहेत. या ठिकाणी अनाधिकृत बांधकामाच्या अनुषंगानं तक्रारी दाखल आहेत. त्याची खातरजमा करून कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि त्याच्या आजोबाला अटक करण्यात आली आहे. तसंच या तिघांसह दोन्ही बार मालक तसंच त्या बारचे मॅनेजर आणि आता ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर यांनाही अटक करण्यात आलीये. त्यामुळं याप्रकणात अजून किती नावं समोर येतील, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा -
- पुणे हिट अँड रन प्रकरण: डॉ.अजय तावरे यांचं निलंबन नव्हे तर त्यांना फासावर लटकवा - विजय वडेट्टीवार - Pune Hit And Run Case
- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण : डॉ. तावरेंचा पाठीराखा मंत्रालयात कितव्या मजल्यावर बसतो? अंबादास दानवे यांचा सवाल - Pune Porsche Car Case
- पुणे हिट अँड रन प्रकरण: "आमदारकी कशी आणि कुठे वापरायची हे कळतं का?'...; अजित दादांनी 'त्या' आमदाराला झापलं... - Pune Hit And Run Case