पुणे Pune Accident News : शहरात अपघाताचा ससेमिरा थांबता थांबत नसल्याचं चित्र दिसत आहे. हिट अँड रन प्रकरण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं कारखाली दोघांना चिरडल्याची घटाना ताजी आहे. आज सकाळी वानवडी परिसरात अपघाताची घटना घडली. व्यायामासाठी निघालेल्या मुलांना एका सुसाट वेगानं धावणाऱ्या टॅंकरनं धडक दिली. यात महिला आणि काही मुलं जखमी झाली आहेत. विशेष म्हणजे टँकर चालक हा 16 वर्षाचा अल्पवयीन मुलगा आहे.
कसा घडला अपघात : सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान (एन आय बी एम) रोड कोंढवा एवर जॉय सोसायटी समोर गीता धुमे ( वय 41 वर्ष) या त्यांच्या स्काय हाइट्स सोसायटी पिसोळी मातोश्री गार्डन कोंढवा पुणे येथील कुस्ती अकॅडमीकडं दुचाकीवरुन जात होत्या. त्यांच्यासह प्रशिक्षण घेणारी मुलं व्यायामासाठी रस्त्यावर धावत होती. यावेळी टँकरनं (क्रमांक एमएच 12 एसइ 4363) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, गीता धुमे दुचाकीवरुन खाली कोसळल्या. यात गीता धुमे आणि सोनी चंद्रसिंग राठोड या किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सत्यानंद हॉस्पिटल कोंढवा इथं उपचार सुरू आहेत. पोलिसांनी टँकरचालक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून टँकर मालक महिंद्रा बोराटे यांची चौकशी सुरू आहे. टँकरला ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच गीता धुमे यांची दुचाकी क्रमांक एमएच 12 डब्ल्यूएच 8718 ही तपासणीसाठी जप्त करण्यात आली. त्यांचा जबाब नोंद करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील ही तिसरी घटना : यापूर्वी मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर इथलं हिट अँड रन प्रकरणात दोघांनी जीव गमावला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं कारखाली दोघांना चिरडलं. त्यात एक गंभीर जखमी तर एकाचा जागीचं मृत्यू झाला. आता ही तिसरी घटना आहे. यात जीवतहानी झाली नसली, तरी मुलं जखमी झाली आहेत.
हेही वाचा