बीड Pankaja Munde : गेल्या काही निवडणुकांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे सातत्यानं चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांच्या नाराजीच्या चर्चाही आल्या होत्या. त्या सध्या 'गांव चलो अभियान' अंतर्गत बीडच्या गावांमध्ये फिरतायेत. या दरम्यान त्यांनी एका गावातील जाहीर सभेत मोठं विधान केलं. आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
राजकारणात वनवास अनुभवायला मिळाला : "मला राजकारणात वनवास अनुभवायला मिळाला. माझ्याबरोबर दगाफटका झाला. मात्र तो कशासाठी झाला? तुमचं माझ्यावरचं प्रेम कळण्यासाठी झाला. वनवास सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या स्मरणात राहात नाहीत. आधी जेवढे लोक मला प्रेम करत होते, त्यापेक्षा दहापट जास्त लोक माझ्यावर प्रेम करायला लागले आहेत. हा माझ्यासाठी फार मोठा बदल आहे", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
प्रत्येक निवडणुकीत नाव चर्चेत येतं : या महिन्याच्या शेवटी राज्यसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. या सर्व चर्चांवर पंकजा मुंडें यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. "गेल्या 5 वर्षांत अशी कोणतीही निवडणूक नव्हती, ज्यात माझं नाव घेतलं गेलं नाही. विधानसभा, राज्यसभा प्रत्येक निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी 'एका पदाच्या' प्रतीक्षेत असल्याचं लोकांना वाटतं. त्यामुळे या चर्चा होतात. या चर्चांवर मी काहीही करू शकत नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोदींनी फार संघर्ष केला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जीवनात फार संघर्ष करावा लागला. त्यांनी चहा विकला. त्यांच्याकडे शाळेत फी भरायला पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. मोदींनी आम्हाला गावागावात जाण्यास सांगितलं आहे, असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का :