अमरावती : "वाह उस्ताद"...असं कोणी कुठं म्हटल्यावर डोळ्यासमोर येतात ते तबला वाजवताना झाकीर हुसैन. आता तीन दिवसांपूर्वी या तबला सम्राटानं जगाचा निरोप घेतला. अमरावतीत सजलेल्या त्यांच्या एकूण पाच मैफिलीत अमरावतीकरांकडून वाहवा मिळवणाऱ्या या महान कलावंताच्या आठवणींना कलारसिक उजाळा देत आहेत. अमरावती संगीत कलोपासक संघाशी अगदी सुरुवातीच्या काळापासून जुळलेले पंडित किशोर नवसाळकर यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उस्ताद झाकीर हुसैन आणि त्यांच्या अमरावती मधील मैफीलींसंदर्भात आठवणी आणि खास किस्से सांगितले.
मणीबाई शाळेच्या मैदानावर पहिली मैफिल : अमरावती कलोपासक संघाच्यावतीनं 1975 मध्ये पहिल्यांदाच अमरावतीत खास संगीत परिषद घेण्याचं ठरलं होतं. पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूर वादन आणि शोभा गुर्टू यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम निश्चित झाला. तबला वादक दिल्ली घराण्याचे निजामुद्दीन खाँ हे झाकीर हुसैन यांचे वडील अल्ला रख्खा यांचे मावस भाऊ होते. अमरावतीच्या पंडित किशोर नवसाळकर यांचे निजामुद्दीन खाँ हे गुरु असल्यानं पंडित किशोर नवसाळकर यांनी अल्ला रखाँ यांच्याकडं झाकीर हुसैन यास अमरावतीला कार्यक्रमासाठी पाठवण्याची परवानगी मागितली. अल्ला रखाँ यांनी परवानगी देताच अमरावतीत पहिल्यांदाच आयोजित भव्य संगीत मैफिलीत उस्ताद झाकीर हुसैन सहभागी झाले होते. शिवकुमार शर्मा यांच्या संतूरबरोबर उस्ताद झाकीर हुसैन यांनी तबल्यावर साथ संगत केल्याचं पंडित किशोर नवसाळकर यांनी सांगितलं.
पहिल्या मैफिलीत अशी झाली गंमत : "खरंतर उस्ताद झाकीर हुसैन यांच्या प्रतिष्ठेला शोभावं असं हॉटेल अमरावती त्यावेळी नव्हतं. शिवकुमार शर्मा आणि शोभा गुर्टू यांची व्यवस्था त्याकाळी शहरात एकमेव असणाऱ्या हॉटेल नीलममध्ये करण्यात आली होती. उस्ताद झाकीर हुसैन यांना मुरली राठी यांच्या बंगल्यात ठेवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी झाकीर हुसैन यांना जे काही मानधन द्यायचं ठरलं ते संतूरवादक शिवकुमार शर्मा यांना देण्यात येणाऱ्या मानधनामधूनच दिलं जाणार होतं. पहिल्या दिवशी शिवकुमार शर्मा यांचा कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी शोभा गुर्टू यांनी माझ्यासोबत देखील झाकीर हुसैन यांनी तबल्यावर साथ द्यावी असा प्रस्ताव आयोजकांकडं मांडला असता आयोजक विचारात पडले होते. झाकीर हुसैन यांना या संदर्भात कशीबशी माहिती दिली असता शोभा गुर्टू या आमच्या आत्या आहेत. त्यांना साथ देणं माझ्यासाठी भाग्याचं असं म्हणत शोभा गुर्टू यांच्या शास्त्रीय संगीताला उस्ताद झाकीर हुसैन यांनी साथ देत सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीकर रसिकांचं मन जिंकलं" अशी आठवण पंडित किशोर नवसाळकर यांनी सांगितली.
भीमसेन जोशींच्या गायकीला साथ संगत : अमरावती संगीत कलोपासक संघाच्यावतीनं श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित संगीत परिषदेत भीमसेन जोशी आणि अली अकबर खाँ या मोठ्या कलावंतांसह पश्चिम बंगालमधील सपना चौधरी या आल्या होत्या. पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनावर त्यावेळी उस्ताद झाकीर हुसैन यांनी तबल्यावर साथ संगत करावी असं त्यावेळी ऐन वेळेवर ठरलं. त्यावेळी भीमसेन जोशी मला सांभाळून घेतील की नाही असं झाकीर हुसैन म्हणाले होते. यावर भीमसेन जोशींनी "मला हरकत नाही तुम्ही माझ्यासोबत असाल तर माझं नाव मोठं होईल" असं झाकीर हुसैन यांना म्हटलं होतं.
विनयशील कलावंत : कार्यक्रम सुरू झाल्यावर मंचावर झाकीर हुसैन यांनी चक्क भीमसेन जोशी यांना साष्टांग नमस्कार घालून मला तुम्ही सांभाळून घ्या असं सर्व लोकांसमोर सांगितलं होतं. इतका मोठा कलावंत असा विनयशील असेल असं लोकांनाही वाटलं नव्हतं. त्यावेळी उस्ताद झाकीर हुसैन यांनी जी साथ संगत भीमसेन जोशी यांच्या गाण्यावर केली ती अप्रतिम अशी होती. पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनावर अत्यंत संयमी आणि साजेशी अशी झाकीर हुसैन यांची साथ लोकांना फार आनंद देणारी ठरली. यानंतर बंगालमधील नामवंत तबलावादक सपना चौधरी आणि झाकीर हुसैन यांची जुगलबंदी अमरावतीकर रसिकांना अनेक वर्ष स्मरणात राहिली. यानंतर वनिता समाज येथे शाहिद परवेज यांच्यासोबत देखील हुसैन यांनी दिलेली साथ ही विलक्षण गाजली होती अशी माहिती नवसाळकर यांनी दिली.
वैजयंतीमाला यांनी दिला झाकीर हुसैन यांना नकार : "श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे अमरावती कलोपासक संघाच्या वतीनं अभिनेत्री वैजयंती माला यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास झाकीर हुसैन यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. आपल्या कार्यक्रमाला झाकीर हुसैन तबल्यावर साथ देणार हे वैजयंतीमाला यांना कळल्यावर त्यांनी झाकीर हुसैन यांच्या तालावर नाचण्याची आता माझ्यात क्षमता नाही असं मोठ्या मनानं सांगितलं. झाकीर हुसैन यांच्या तबला वादनावर आपल्याला नाचणं शक्य नाही म्हणून कार्यक्रमाला वैजयंतीमाला यांनी चक्क नकार दिला. अशा बिकट प्रसंगात अमरावती कलोपासक संघानं झाकीर हुसैन यांचा अमरावती दौरा रद्द करून वैजयंतीमाला यांच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला" अशी माहिती देखील पंडित किशोर नवसाळकर यांनी दिली.
नवोदितांना झाकीर हुसैन यांची दाद : "नवोदित कलावंत जेव्हा स्टेजवर तबला वाजवत असत त्यावेळी अगदी समोर बसून झाकीर हुसैन आपलं अंतःकरण किती विशाल आहे हे दाखवायचा प्रयत्न करीत असत, त्यावरून त्यांच्या एकंदर वागणुकीचा आणि त्यांच्या विनयशील स्वभावाचा अनुभव अमरावतीकरांना अनेकदा आला. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या गायनाच्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी झाकीर हुसैन यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम होता. यामुळं झाकीर हुसैन यांनी हॉटेलमध्ये जाऊन आराम करावा असा आग्रह आम्ही त्यांना केला. मात्र मला आजची मैफल प्रेक्षक म्हणून अनुभवायचीय असा त्यांचा हट्ट होता. त्या मैफिलीत अश्विनी भिडे-देशपांडे यांना मी स्वतः तबल्यावर साथ दिली. माझा तबला वादनाचा अभ्यास हा दिल्ली घराण्याचा तर झाकीर हुसैन यांची कला पंजाब घराण्याची. असं असताना ह्या मैफिलीत मी स्वतः पंजाब घराण्याचे काही बोल वाजवलेत. मैफिलीनंतर झाकीर हुसैन यांनी पंजाब घराण्याचे बोल वाजवण्यासंदर्भात माझी तारीफ करत हे कुठून कळलं असं मला विचारलं. त्यावेळी अगदी पहिल्या भेटीत तुमचे वडील अल्लारखाँ यांनी तुमच्या पंजाब घराण्यातील तबला वादनाच्या दोन प्रती मला तेव्हा दिल्या होत्या. त्या मी जपून ठेवल्या आणि आज तुमच्यासमोर त्या सादर केल्या असं सांगितल्यावर झाकीर हुसैन अगदी भारावून गेले. त्यांनी माझी भरभरून प्रशंसा केली होती" अशी खास आठवण देखील पंडित किशोर नवसाळकर यांनी सांगितली.
मानधनाचा हट्ट नाही : प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर असताना सातत्यानं परदेशात झाकीर हुसैन हे आपले कार्यक्रम गाजवत असताना देखील, अमरावती शहरात अमरावती कलोपासक संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमासाठी त्यांनी कधीही मानधनाबाबत अडवणूक केली नाही. जितकं मी देऊ शकलो तितकच त्यांनी घेतलं. एक रसिक आणि चाहता वर्ग त्यांचा अमरावतीत तयार झाला. तबला वादनाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय हे झाकीर हुसैन यांना आहे, असं पंडित किशोर नवसाळकर म्हणाले.
हेही वाचा -