पालघर Palghar News : केंद्र सरकारच्या ‘हर घर जल योजने’चा मोठा डांगोरा पिटला जात असला, तरी ग्रामीण भागातील काही गावं मात्र या योजनेपासून कोसो मैल दूर आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहरापासून अवघ्या पाच-सात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या 'जांभळीचा माळ' या अडीच हजार लोकवस्तीच्या गावात नागरिकांना जंतू आणि किडेमिश्रित दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या गावाची ही व्यथा असेल, तर दुर्गम भागात काय होत असेल? याची कल्पनाच करता येत नाही. पालघर जिल्हा आदिवासी असूनही या भागात योजनांसाठी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. मात्र, अजूनही या भागातील लोकांना पाणी मिळत नाही.
टंचाई असताना टँकर नाही : जव्हार तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असले तरी या गावाला मात्र टँकर सुरू करण्यात आलेलं नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून जांभळीचा माळ पाणीटंचाईचा सामना करतोय. निवडणुकीच्या वेळी मतदान मागण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी आश्वासनांचा पाऊस पाडतात. परंतु, त्यानंतर पिण्याच्या पाण्याचं आश्वासन पूर्ण करण्याकडं त्यांचं दुर्लक्ष होतं.
विहिरी आटल्या, झरे कोरडे : जांभळीचा माळ परिसरातील सर्व विहिरी आटल्या असून झरे कोरडे पडलेत. ग्रामपंचायतीनं बांधलेल्या विहिरीतील पाणी अत्यंत दूषित असून वापरण्यायोग्य नाही. या गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी महिलांना दोन-तीन हंडे घेऊन जावं लागतं. शाळेतील चौथी-पाचवीच्या मुलींनाही दऱ्या, खोऱ्यात असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी जुंपलं जातं. ही मुलं तयार नसली, तरी पालक बळजबरीनं त्यांना तयार करतात. दोन-दोन हंडे घेऊन मान मोडून ही मुलं दऱ्या-खोऱ्यातून पाणी आणतात.
त्वचाविकारांना निमंत्रण : ग्रामस्थांना प्यावं लागणारं पाणी दूषित असून ते गाळ, किडे आणि जंतूमिश्रित आहे. त्यामुळं हे पाणी नागरिकांना प्यावं वाटत नाही. परंतु त्यांच्यापुढं दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. तसंच मुळातच हे पाणी दूषित असल्यानं नागरिकांना त्वचा विकारांना आणि पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागतंय. सर्दी, खोकल्यासह अन्य आजारही पाठ सोडत नाहीत. या विहिरीतील पाण्याचे जंतूनाशकेही टाकली जात नाहीत. काही महिलांना तर पन्नास-साठ वर्षापासून असंच पाणी आणण्याचं काम करावं लागत असल्याचे त्यांचे अनुभव आहेत.
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेबद्दल खंत : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसंच अन्य लोकप्रतिनिधी जांभळीचा माळच्या पाणी प्रश्नाकडं लक्ष देत नाही, अशी खंत या महिला व्यक्त करतात. जव्हार शहरापासून जवळ असलेल्या या गावासाठी कायमस्वरूपी पाणी योजना राबविण्याची मागणी त्यांनी केली आहे. नागरिकांना अनारोग्याच्या समस्येतून कायमचं सोडवण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्राधान्यांनं निकाली काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हेही वाचा -
- रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिवशी मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म, सामाजिक एकतेचं उदाहरण देणारं 'हे' ठेवलं नाव
- मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 16 टक्केच पाणी! 'या' तारखेपर्यंत पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन - Water Shortage In Mumbai
- जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue