मुंबई Minor Girl Sexual Assault Case : पश्चिम बंगालमधील कोलकोता इथं डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. त्यातच मुंबई जवळ असलेल्या बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे संतप्त पालकांनी बदलापूर बंदची हाक दिली. आज सकाळी बदलापूर परिसरात जनता रस्त्यावर उतरल्यानं आंदोलन चिघळलं. त्यामुळे आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू असून, आंदोलकांकडून नराधमांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणी आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
नराधमांना कायद्याचा धाक राहिला नाही - विजय वडेट्टीवार : विशिष्ट संस्था असल्यानं या प्रकरणाती आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या प्रकरणी "पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करावं अशी मागणी देखील त्यांनी केली. या प्रकरणी पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलीस स्थानकात बसवून ठेवलं. त्यामुळे कारवाई करण्यात यावी त्यासह हे प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी," अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. कायदा आहे कुठे, काय करताय गृहमंत्री, असा थेट सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. कायद्याचा धाक अजिबात राहिलेला नाही. सरकार झोपलं का, याकडं सरकारनं लक्ष दिलं नाही तर, महाराष्ट्रातील मुली, महिला सुरक्षित राहणार नाहीत, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra | On alleged sexual assault with a girl child at a school in Badlapur, Shiv Sena (UBT) leader Uddhav Thackeray says, " not only in badlapur, such incidents should not happen anywhere in the country...we were going to pass the shakti bill but our govt was toppled. it is… pic.twitter.com/thqdR3cUBO
— ANI (@ANI) August 20, 2024
महिलांवरील अत्याचाराकडं दुर्लक्ष - बाळासाहेब थोरात : सत्तेच्या लालसापोटी लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजुला स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर कारवाई करायची नाही, हे सरकारचे धोरण आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचार त्यानंतर बालकांवर अत्याचार सुरू झाला आहे. हे भयानक स्वरूप पाहायला मिळत आहे, अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सोशल माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. नवी मुंबईनंतर आता बदलापूर असं म्हणत, त्यांनी लहान मुलीवर घडलेला प्रसंग अतिशय संताप जनक आहे. त्याचा तीव्र शब्दात आपण निषेध करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. नोएडा सारखी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याचं गृह खातं काय करत आहे, मुग गिळून बसलंय का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. योजनेच्या माध्यमातून पैसा वाटला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागातील मुली सुरक्षित राहतील का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही शक्ती विधेयक मंजूर करणार होतो, मात्र आमचं सरकार पाडलं : बदलापूर इथल्या शाळेत चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. "फक्त बदलापूरमध्येच नाही, तर देशात कुठंही अशा घटना घडू नयेत. आम्ही शक्ती विधेयक मंजूर करणार होतो. मात्र आमचं सरकार पाडल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शक्ती विधेयक मंजूर केलं. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण मला या प्रकरणात राजकारण करायचं नाही. त्यामुळे दोषी असणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे."
हेही वाचा :
- चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; संतप्त जमावानं रेल्वेसेवा रोखली, बलात्काऱ्याला फाशीची मागणी - Man Raped On 4 Year Girl
- बदलापूर अत्याचार घटनेची सरकारकडून गंभीर दखल; शाळा मुख्याध्यापिका निलंबित, कठोर कारवाईचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश - Badlapur Girls Sexually Assaulted
- बदलापूर चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले एसआयटी चौकशीचे आदेश - SIT Probe In Badlapur Rape Case