छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - कायद्यानं बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा ( Nylon Manja News ) पतंगबाजीसाठी सर्रासपणे वापर सुरू आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच सकाळी चक्क पोलीस अधिकारी मांजामुळे जखमी झाल्याची घटना समोर घडली. पोलीस उपनिरीक्षक दीपक पारदे असे जखमी अधिकाऱ्याचं नाव आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजा विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत अनेकांचे गळे चिरल्याच्या राज्यात घटना घडल्या आहेत. अशातच पोलीस अधिकारी दीपक पारदे मांजामुळे जखमी झाले आहेत. ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे कर्तव्यात नियुक्त आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस अधिकारी मांजामुळे जखमी- ग्रामीण पोलिसात कार्यरत असलेले दीपक पारदे सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी नाईकनगर येथून निघाले. रेणुका माता कमानीजवळ पोहोचल्यानंतर त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. मांजा अडकल्यानं ते खाली पडले. गळ्यात मांजा अक्षरशः गुंडाळला गेला होता. त्यांच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तातडीने दर्गा चौकातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती नाजूक असल्यानं तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
पोलिसांनी जनजागृती मोहीम घेऊनही मांजा विक्री जोरात- शहरात ठिकठिकाणी पोलिसांकडून नायलॉन मांजावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तरीदेखील शहरात हा मांजा सर्रास वापरला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मकर संक्रांत हा उत्सव उत्साहात साजरा करताना पतंग उडविण्याची चढाओढ सुरू असते. इमारतीच्या छतावर संगीताच्या तालावर, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन पतंगबाजी केली जाते. जुन्या शहरात मोठ्या-प्रमाणात धोका असतो. मागील काही वर्षात साध्या मांजाऐवजी नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे सुरू आहे. कायद्याने बंदी असतानाही प्रशासनाकडून वापरकर्ते आणि विक्रेत्यांना ढील दिल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, छुप्या मार्गान शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा येत आहे. संक्रांतीनिमित्त पतंगबाजी करणारे तर हमखास नायलॉन मांजाचा वापर करत आहेत.
हेही वाचा-