मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात भरघोस यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये अद्यापही मुख्यमंत्री कोण, याबाबत साशंकता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, की भाजपा इतर राज्यांसारखं धक्कातंत्र वापरणार याची चर्चा सध्या सुरू आहे. मात्र भाजपाच्या गोटातून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा जोर धरत आहे. त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यासाठी केंद्रीय निरीक्षक मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं आहे. विजय रुपाणी मंगळवारी मुंबईत दाखल झाले. तर रात्री उशीरा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचंही मुंबईत आगमण झालं.
#WATCH | Maharashtra: Union Finance Minister Nirmala Sitharaman reaches Mumbai.
— ANI (@ANI) December 3, 2024
BJP will have a meeting of the Legislative Party of Maharashtra BJP today to elect the Leader of Legislative Party. pic.twitter.com/xkmQALojEp
निर्मला सीतारामण मुंबईत दाखल : विधानसभा निवडणूक 2024 निकालात भाजपाला जनतेनं भरभरुन मतांचं दान दिलं. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भाजपाचं घोडं अडलं. महायुतीत मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं यावरुन जोरदार खल सुरू झाला. अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यामुळे मुख्यमंत्री ठरवण्यात कोणतीही अडचण नसल्याचं जाहीर केल्यानंतर या नाराजीनाट्यावर पडदा पडला. त्यानंतर मोठ्या हालचाली घडल्या आहेत. भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना निरीक्षक म्हणून मुंबईत पाठवलं आहे. रात्री उशीरा निर्मला सीतारामण मुंबईत दाखल झाल्या आहेत.
आज होणार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब : कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री यावरुन सध्या राजकीय पक्षात बराच गोंधळ सुरू आहे. भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी तसं सुतोवाच केलं आहे. मात्र धक्कातंत्राचा अवलंब करण्यात भाजपाचा हातखंडा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारावरुन अजूनही गोंधळ सुरू आहे. आज सायंकाळपर्यंत भाजपाचे निरीक्षक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते, की भाजपा धक्कातंत्राचा अवलंब करते, हे आज सायंकाळी स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :