मुंबई NCP Sharad Pawar Party star campaigners : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच राज्यात संभांचा धुरळा उडणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून सभेसाठी मैदान आणि प्रचार रॅलीसाठी नियोजन केले जात आहे. (star campaigners) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे निवडणुकीसाठी चाळीस स्टार प्रचारकांची यादी सादर केली आहे. यात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहित पवार, राजेश टोपे, एकनाथ खडसे यांच्यासह चाळीस चेहऱ्यांचा सामावेश आहे.
स्टार प्रचारकांची यादी : काँग्रेस पक्षाकडून चाळीस, भाजपाकडून चाळीस, शिंदे शिवसेनेकडून चाळीस, ठाकरे गटाकडून सतरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सदतीस स्टार प्रचारकांची यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. भाजपा आणि शिवसेना पक्षातील स्टार प्रचारकांच्या यादीत सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश पाहायला मिळतो.
नवीन चेहऱ्यांना संधी : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसेंसह मुलगी रोहिणी खडसे यांना देखील स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ आणि दिग्गज नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात नवीन चेहऱ्याना संधी दिली आहे. त्यात कुमारी सक्षणा सलगर, पूजा मोरे, महबूब शेख आणि जावेद हबीब यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
उद्या दुसरी यादी होणार जाहीर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर झाली होती. त्यामध्ये पाच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. त्यात बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे, शिरूर मधून अमोल कोल्हे, दिंडोरी मधून भास्कर भगरे, वर्ध्यामधून अमर काळे आणि अहमदनगर मधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या बुधवार (दि. 2 एप्रिल)रोजी दुसरी यादी जाहीर होणार असल्याची माहिती समोर येतं असून, रावेर मधून संतोष चौधरी, भिवंडीमधून बाळ्या मामा म्हात्रे, बीडमधून बजरंग सोनावणे, माढा मधून धैर्यशील मोहिते आणि साताऱ्यामधून सत्यजित पाटणकर ह्या पाच लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांचा सामावेश असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतं आहे.
शरद पवार हेच आमचे स्टार प्रचारक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. आमचे स्टार प्रचारक शरद पवारच आहेत. ज्या-ज्या ठिकाणी शरद पवार जातात, उभे राहतात त्या-त्या ठिकाणी राजकारण आणि मतदारांची भावना बदलून शरद पवार यांच्या मागे मतदार उभे राहत असतात. 2019 साली ज्या प्रकारे शरद पवारांनी साताऱ्यात उभ्या पावसात सभा घेतली आणि त्याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्राने पाहिला आहे. महाविकास आघाडीतील जास्तीत जास्त जागा निवडून येण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे. शरद पवार यांना पाहण्यासाठी देखील लोक उत्सुक आहेत. आम्ही जरी स्टार प्रचारक असलो तरी आमचे मुख्य स्टार प्रचारक शरद पवारच असून, त्यांचा करिष्मा लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
2 अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
3 भाजपावर मित्रपक्ष संपवण्याचा आरोप, लोकसभा निवडणुकीत बसणार महायुतीला फटका? - Lok Sabha Elections 2024