नागपूर Nagpur Google Boy Anish Khedkar : एखाद्या व्यक्तीला एकाद दुसऱ्या किंवा फारफार तर चार, पाच विषयांची सपूर्ण माहिती असेल. त्यासाठी त्या व्यक्तीनं जीवनाची अनेक वर्षे खर्ची घातली असतील. पण नागपूरचा सहा वर्षीय "गुगल बॉय" म्हणून ओळख असलेल्या अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्यानं स्पेस सायन्स, रॉकेट, जेट फ्लाईट, हेलिकॉप्टर, जगातील अनेक देशांच्या चलनासह विविध विषयांची सखोल माहिती घेतलीय. अनिशला या विषयांमधील दोन हजार प्रश्नांची उत्तरं तोंडपाठ झाली आहेत. अनिशच्या नेत्रदीपक यशामागे त्याची आजी स्मिता पंडित यांचं विशेष योगदान आहे. स्मिता पंडित यांनी कर्करोगाशी लढत असताना अनिशवर केलेल्या संस्कारामुळं तो आज अवघ्या सहाव्या वर्षी 'गुगल बॉय' म्हणून नावारूपाला येत आहे.
अनिश अवघ्या 2 वर्षांचा होता, तेव्हा तो नागपूरला आजीकडं राहायला आला होता. अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्तानं शहर बदलावं लागतं असल्यानं अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडं नागपूरला राहायला आल्या. सुरुवातीला अनिश नुकताचं चालायला आणि बोलायला शिकत असताना तो अंतराळच्या चित्रांमध्ये रमायचा. अवघ्या दोन वर्षांच्या अबोल बालकाची स्पेसमधील रुची थक्क करणारी होती. इथून अनिशच्या असाधारण बुद्धीमत्तेला आकार देण्याचा प्रवास सुरू झाला.
'या' विषयावर केलाय सखोल अभ्यास : अनिशला स्पेस सायन्समध्ये सर्वाधिक रस असून अंतराळाशी संबंधित 500 तथ्यांची त्याला माहिती आहेत. तसंच त्याला जगातील 195 देशांची राजधानी तोंडपाठ असून नकाशावर देखील तो कोणता देश कुठय? कोणत्या खंडात आहे? याची माहिती सांगतो. जागतिक 50 स्मारकांचीही त्याला माहिती आहे. तर भारतातील राज्यं आणि त्यांच्या राजधानीबद्दल तर विचारायलाच नको, 150 कारचे लोगोही तो ओळखतो. जागतिक चलनाच्या बाबतीतील त्याचं ज्ञान तर थक्क करणारं आहे. याशिवाय रॉकेट, जेट फायटर, फायटर हेलिकॉप्टर आणि मंगळयान, चंद्रयान, गगनयान, आदित्य L1 बद्दलही त्याच्याकडं अफाट नॉलेज आहे.
कर्करोगाशी लढताना आजीनं अनिशवर केले संस्कार : अनिश केवळ दोन वर्षांचा होता, त्यावेळी तो आजी स्मिता पंडित यांच्याकडं नागपूरला राहण्यासाठी आला. अनिशची आई कल्याणी आणि आजी स्मिता पंडित यांनी अनिशला घडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. रोज नवनवीन माहिती आणि प्रयोग स्मिता पंडित यांच्या घरी होऊ लागले. बघता-बघता अनिश अनेक विषयांमध्ये पारंगत होऊ लागला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक स्मिता पंडित यांना कर्करोगाचं निदान झालं. एकीकडं उपचार, किमो थेरपीचा असह्य होणारा त्रास सहन करत असताना त्यांनी अनिशच्या अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. तसंच त्याची आई कल्याणी खेडकर या गर्भवती असताना त्यांनी स्पेस सायन्स, आंतरराष्ट्रीय घडामोडी, संस्कृती, शैक्षणिक यासह अनेक विषयांचं वाचन आणि अभ्यास केलाय. त्याचा सकारात्मक परिणाम आज अनिशवर दिसून येतोय, असं त्याच्या आजीचं म्हणणं आहे.
हेही वाचा -