मुंबई Mumbai Police Horse Mounted Patrolling Unit : मुंबईत ब्रिटिश राजवट लागू असताना घोडदळ कार्यरत होतं. त्यानंतर 2018-19 साली पुन्हा मुंबई पोलीस दलात घोडदळ सुरू करण्याचा प्रयत्न झाला. जानेवारी 2020 मध्ये प्रत्यक्षात मुंबई पोलीस दलात या घोडदळाची स्थापना करत 12 घोड्यांची खरेदी करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव बारा घोड्यांपैकी सहा घोडे मृत्युमुखी पडले. त्यानंतर घोडदळासाठी पुन्हा राज्य सरकारकडं 65 कोटींचा निधी आणि 30 घोड्यांच्या खरेदीसाठी प्रस्ताव मुंबई पोलिसांनी दिला होता. या प्रस्तावाला 26 जुलै रोजी राज्य सरकारनं मंजुरी दिली. मात्र, असं असलं तरी मंजूर झालेला 36. 53 कोटींचा निधी अद्याप जमा झालेला नाही.
मुंबई पोलीस दलाच्या प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त एस जयकुमार यांनी सांगितलं की, "30 घोडे आणि 65 कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 36.53 कोटीचा निधी मंजूर झाला. मात्र, अद्याप निधी आम्हाला मिळालेला नाही. सध्या मुंबई पोलीस दलात दोन घोडे कार्यरत असून त्यांना मरोळ येथे ठेवण्यात आलंय."
यापूर्वी सहा घोड्यांचा मृत्यू : मुंबई पोलीस दल सोडल्यास कर्नाटक, हैदराबाद, चेन्नई, केरळ, कोलकाता आणि गुजरात पोलिसांकडं स्वतःचे घोडदळ आहेत. मुंबईतील गर्दी पाहता मुंबईच्या रस्त्यांवर मुंबई पोलीस घोड्यांवरून गस्त घालताना दिसणं थोडं अवघड आहे. असे असले तरी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर हे घोडदळ चांगल्या प्रकारे काम करू शकतात. मात्र, 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी स्थापन केलेल्या घोडदळात सामील झालेल्या सहा घोड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळं मुंबई पोलीस दलात घोडदळ किती यशस्वी ठरणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
50 पोलिसांना घोड्यांवरून गस्त घालण्याचं प्रशिक्षण- 2020 मध्ये मुंबई पोलिसांना कमी निधी मिळाल्यामुळं रेस कोर्समधून रिटायर झालेले जास्त वयाचे घोडे खरेदी करण्यात आले होते. त्याचप्रमाणे तबेल्याच्या जागेचा प्रश्न, घोड्यांच्या आहाराकडं दुर्लक्ष आणि पुरेसा निधी नसल्यामुळं घोडदळासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. यंदा मुंबई पोलीस दलातील घोड्यांसाठी मरोळ येथे सोयी सुविधांनी सज्ज असा तबेला बांधण्यात आलाय. तसंच 50 पोलिसांना घोड्यांवरून गस्त घालण्याचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचंदेखील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलंय. त्यामुळं 2020 नंतर पुन्हा 2024 मध्ये मुंबई पोलीस दलात घोडदळ किती यशस्वी ठरणार याकडं सर्वांचं लक्ष आहे.