मुंबई Mumbai Crime News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करुन एका व्यक्तीनं 'बडेमिया' हॉटेलच्या मालकाची फसवणूक केली. आरोपीनं बिर्याणी आणि गुलाब जामुनसह शेकडो खाद्यपदार्थ मागवून पैसे दिले नसल्याचं समोर आलय. इतकंच नाही तर आरोपीनं हॉटेल मालकाच्या मुलीला लॉ कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असं सांगत हॉटेल मालकाकडून आणखी पैसे उकळले. आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच हॉटेल मालक जमाल मोहम्मद यासीन शेख यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मंगळवारी (9 ऑगस्ट) आरोपी सूरज कलव (वय-30) याला करी रोड येथून अटक करण्यात आल्याची माहिती, काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिलीय. तसंच सूरज विरोधात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
नेमकं काय आहे प्रकरण : 'बडेमिया' हॉटेलचे मालक जमाल मोहम्मद यासीन शेख यांनी याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, सूरज नावाच्या व्यक्तीनं शेख यांना फोन करून आपण अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत जुलैपासून अनेकवेळा जेवणाची ऑर्डर दिली. त्यापैकी एक ऑर्डर 200 प्लेट बिर्याणी आणि गुलाब जामुनची होती. शेख यांनी सूरजकडं जेवणाच्या पैशांची मागणी केली असता त्यानं सावंत हे एकाचवेळी सगळे पैसे देतील असं सांगितलं. शेख यांनी याअगोदर देखील अरविंद सावंत यांच्यासाठी जेवण पुरवलं होतं. त्यावेळी तत्काळ पैसे देण्यात आल्यानं शेख यांनी सूरजला पार्सल पाठवले. त्यांनी सूरजनं सांगितलेल्या ठिकाणांवर अनेकवेळा जेवण पाठवलं. मात्र, या सर्व ऑर्डर्सचं बिल 2 लाख रुपये इतकं झाल्यानंतर हॉटेल मालकांनी पुन्हा एकदा सूरजकडं पैशांची मागणी केली. तेव्हा त्यानं सावंत यांच्याशी बोलून पैसे देतो असं सांगितलं, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यानं दिली.
मुलीचं अॅडमिशन करुन देतो म्हणतही उकळले पैसे : आरोपी सूरजनं आपली ओळख अरविंद सावंत यांच्यासह आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्याशी असल्याचं शेख यांना अनेकवेळा सांगितलं होतं. शेख यांची मुलगी रिजवी लॉ कॉलेज, वांद्रे येथे शिक्षण घेत होती. मात्र, रोज येणं-जाणं दूर पडत असल्यानं त्यांना मुलीचं अॅडमिशन चर्चगेट येथील शासकीय लॉ कॉलेजमध्ये घ्यायचं होतं. यासंदर्भात शेख यांनी सूरजला सांगितलं. तेव्हा सूरजनं खासदार-आमदारांशी बोलून तुमचं काम करुन देतो असं आश्वासन दिलं. त्यानंतर सूरजनं टप्प्याटप्प्यानं शेख यांच्याकडून 9 लाख 27 हजार रुपये उकळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर आरोपी सूरजवर काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 204, 316 (2) (गुन्हेगारी विश्वासभंग) आणि 318 (4) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. तर चौकशीदरम्यान सूरज, अरविंद सावंत यांचा स्वीय सहाय्यक नसल्याचं तसंच त्याची कोणत्याही नेत्यासोबत ओळख नसल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा -