मुंबई : 'गणेशोत्सवा'सह मुंबईतील 'नवरात्रोत्सव'देखील प्रसिद्ध आहे. मुंबईत अशी अनेक मंडळं आहेत, जिथं देवीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसेच मुंबईतील महालक्ष्मी मंदिर आणि मुंबादेवीच्या दर्शनासाठीदेखील मोठ्या प्रमाणात भाविक नवरात्रीच्या काळात येत असतात. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासनानं मेगा ब्लॉक जाहीर केल्यानं भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ठाणे ते कल्याण ब्लॉक : मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या आणि जलद गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर, कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या जलद गाड्या कल्याण ते ठाण्यादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. हा ब्लॉक सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी सुरू झाला असून, दुपारी तीन वाजून 40 मिनिटांनी ब्लॉक समाप्त होणार आहे.
वाशी ते पनवेल ब्लॉक : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरदेखील वाशी ते पनवेलदरम्यान तांत्रिक कारणांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, या ब्लॉकमुळं बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सेवा आज मेगा ब्लॉक कालावधीसाठी रद्द करण्यात आली आहे. तर, दुसरीकडं ठाणे ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सेवादेखील ब्लॉक कालावधीत पूर्णपणे बंद असणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील हा मेगाब्लॉक सकाळी 11 ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे.
दहा तासांचा : गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आलाय. हा ब्लॉक शनिवारी (5 ऑक्टोबर) रात्री 23:00 ते रविवार 09:00 पर्यंत घेण्यात आलाय. यादरम्यान कांदिवली आणि गोरेगावदरम्यान जलद मार्गावर 23:00 ते 03:30 वाजेपर्यंत 4:30 तासांचा ब्लॉक घेण्यात आलाय.
वाहतुकीवर परिणाम : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात आला असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होताना दिसतोय. मेगाब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. रेल्वेची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता हा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलंय. मात्र, यामुळं प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक काळजीपूर्वक तपासावं आणि आवश्यकतेनुसार प्रवासाचे पर्यायी मार्ग वापरावेत, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय.
हेही वाचा -
- रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक; गणपती खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची होणार गैरसोय - Mumbai Local Mega Block
- सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे 'मेगाहाल'; आज किती गाड्या रद्द? - Mumbai Mega Block
- प्रवाशांनो लक्ष द्या...; रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा वेळापत्रक - Mumbai Railway Mega Block