मुंबई Lakhan Bhaiya Encounter Case : रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्याच्या कथित बनावट चकमकीच्या 18 वर्ष जुन्या प्रकरणात मुंबईचे माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्माची 2013 सालची निर्दोष मुक्तता मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी (19 मार्च) रद्द केली. तसंच नोव्हेंबर 2006 मध्ये झालेल्या लखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना कनिष्ठ न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा देखील मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. तीन आठवड्यांत शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.
तसंच ट्रायल कोर्टानं 13 अन्य आरोपींना दोषी ठरवलं होतं आणि प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती. परंतु, हायकोर्टानं आता प्रदीप शर्माची निर्दोष सुटका रद्द केली आणि पुराव्याच्या आधारे त्याला दोषी ठरवलंय, तसंच जन्मठेपेची शिक्षाही कायम केली आहे. एकूण 13 आरोपींना हायकोर्टानं दोषी ठरवलं आहे. प्रदीप शर्मा हा अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांडातीलही आरोपी आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? : वसईत राहणाऱ्या रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकानं छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी लखन भैय्याचं पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथं एन्काऊंटर झालं. या इन्काऊंटरचं नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मानी केलं होतं. त्यानंतर ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैयाच्या भावानं केला. तसंच या विरोधात त्यानं न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयानं या प्रकरणी 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवत सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणात न्यायालयानं प्रदीप शर्माची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर वकील राम प्रसाद गुप्ता आणि लखन भैय्याच्या भावानं प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. तसंच प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात राज्य सरकारनंही याचिका दाखल केली होती.
कोण आहे प्रदीप शर्मा? : प्रदीप शर्माची पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त राहिलीय. व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया बॉम्ब प्रकरणी प्रदीप शर्माला अटकही करण्यात आली होती. शर्मा 1983 च्या बॅचचे अधिकारी असून 2020 मध्ये ते निवृत्त होणार होते. मात्र, त्यापुर्वीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवलं होतं. परंतु राजकारणात प्रदीप शर्माला अपयश आलं.
हेही वाचा -
- नालासोपारा बनावट चकमक प्रकरणी पोलिसांच्या सहभागाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
- साखर कारखान्यांना इथेनॉल बंदी का केली? केंद्र शासनानं प्रतिज्ञापत्र दाखल करावं, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
- चाळीस वर्षापूर्वी केलेली चूक डॉक्टरला भोवली! शस्त्रक्रियेत हाताची नस कापल्यानं झाला होता रुग्णाचा मृत्यू; हायकोर्टानं केला पाच लाखाचा दंड