मुंबई Mumbai Fraud News : पुण्यातील 'विंडसन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या खासगी कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशानं बनावट डेटा केल्याप्रकरणी सायबर इन्व्हेस्टिगेशन युनिटने (सीआययू) एका चार्टर्ड अकाउंटंटला अटक केली आहे. मोहित जैन (वय 30) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. दरम्यान, 12 डिसेंबर रोजी विंडसन प्रोजेक्ट्सचे पार्टनर असलेल्या शैलेंद्र राठी यांनी दक्षिण सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
काय आहे प्रकरण : शैलेंद्र राठी यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटलंय की, @satya_karmaa हँडल असलेल्या X युजरने 7 डिसेंबर रोजी एक आक्षेपार्ह ट्विट पोस्ट केले. त्यामध्ये विंडसनचा 3000 कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला. या ट्विटमध्ये असा दावा करण्यात आलाय की, एक प्रमुख व्यावसायिक कंपनीदेखील या कथित घोटाळ्याचा भाग होती. हे पैसे विंडसनच्या बँक खात्यात जमा करायचे होते. त्यानंतर शैलेंद्र राठी यांनी पुरावा म्हणून एक लिंक दिली. पण ती सुरू नसल्याचं निष्पन्न झालं. त्यावेळी असं लक्षात आलं की, X खाते @satya_karmaa आरोपीनं डिलीट केले होते.
अंधेरीतून आरोपीला अटक : सायबर पोलिसांनी डेटा फोर्जिंगचा संशय घेऊन, अज्ञात X वापरकर्त्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास सीआययूने स्वीकारला. सखोल तांत्रिक तपासणीत मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीच्या बँक खात्यातील डेटाचे बनावटीकरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जैन याला राहत्या घरून अंधेरी येथून 27 जानेवारी रोजी अटक करण्यात आली.
पुढील तपास सुरू : या प्रकरणाची पुढील तपासणी सध्या पोलीस करत आहेत. तसंच आरोपीचा हेतू काय होता? यामध्ये इतरांचाही सहभाग आहे का?, यासंदर्भातील तपास केला जाईल, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जैन यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जैन याला कोर्टात हजर केले असता कोर्टानं त्याला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा -