नांदेड Poisoned In Nanded : लोहा तालुक्यातील कोष्टवाडी गावात जवळपास एक हजारहून आधिक भाविकांना विषबाधा झालीय. संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये भगर खाल्ल्यामुळं ही विषबाधा झाली आहे. बाधित रुग्णांवर लोहा शासकीय आणि खासगी, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्रीपासून मिळेल, त्या वाहनानं रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
एक हजाराहून अधिक रुग्णांना विषबाधा : बाळूमामाच्या यात्रेनिमित्त कोष्टवाडी गावात यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेनिमित्त अनेक गावचे भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जवळपास पाच हजाराहून अधिक भाविक यात्रेला हजर होते. यावेळी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आलं होतं. भगर खाऊन जवळपास एक हजाराहून अधिक रुग्णांना विषबाधा झाली आहे. ग्रामीण रुग्णालय तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुग्णालय, गुरुगोविंद सिंग राजकीय रुग्णालय इथं देखील उपचार सुरू आहेत.
रुग्णांची प्रकृती स्थिर : रुग्णालय प्रशासनानं तातडीनं या रुग्णावर उपचार सुरू केले. विषबाधा ग्रस्त नागरिकांचा आकडा आणखीन वाढत चालला होता. त्यामुळं इतर रुग्णालयात रुग्णांना हलवण्यात आलं. तर रात्री तीन नंतर डॉक्टर तसेच नर्सेस यांना कामावर रुजू करुन रुग्णांना उपचार देण्यात आले. सध्या विषबाधा ग्रस्त सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप एकाचाही मृत्यू झाला नसून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिलीय.
महाप्रसादाचे आयोजन : लोहा तालुक्यात कोष्टवाडी या छोट्याशा गावात बाळूमामाच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळं महाप्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रण दिलं होतं. तसेच अन्य गावातील बाळूमामांचे भक्त या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादात भगरचा समावेश करण्यात आला होता. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला होता. त्यानंतर विषबाधेची घटना घडली.
हेही वाचा -