चंद्रपूर Mobile Snatching : चंद्रपूर शहरात आता चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र दिसून येतंय. चंद्रपुरात एक युवती मोबाईलवर बोलत जात असताना तिच्यावर पाळत ठेवणाऱ्या चोरट्यांनी तिचा मोबाईल हिसकावून दुचाकीवर धूम ठोकली. आपला मोबाईल वाचवण्यासाठी तिनं प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी तिला फरफटत नेल्याची घटना समोर आली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 27 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडली असून याबाबत युवतीनं रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चोरट्यांचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय.
चोरट्यांनी युवतीला नेलं फरफटत : प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी 27 फेब्रुवारीला रात्री 8.30 च्या दरम्यान नगीनाबाग परिसरातून सवारी बंगल्याकडं फोनवर बोलत जात होती. यादरम्यान मागून तिच्यावर चोरटे दुचाकीवर पाळत ठेऊन होते. ती एका प्रार्थनास्थळाजवळ आली असता मागून दुचाकी आली. दुचाकीवर मागं बसलेल्या चोरट्यानं तिचा मोबाईल हिसकावला, मात्र यासाठी युवतीनं विरोध केला. चोरट्यांनी दुचाकी पळवली. मात्र युवतीनं हातातला मोबाईल सोडला नाही. याठिकाणी दोघांमध्ये झटापट झाली. गाडीसोबत मोबाईल वाचवण्यासाठी ती धावत होती. मात्र चोरट्यांनी तिला आपल्या दुचाकीनं फरफटत नेलं. अखेर या झटापटीत ती जोरात जमिनीवर कोसळली आणि चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद : दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत युवतीनं रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान चंद्रपूर पोलिसांसमोर निर्माण झालंय. भर वस्तीच्या ठिकाणी युवतीसोबत असे प्रकार होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.
हेही वाचा :
- मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून महिलेची हत्या, विधीसंघर्षग्रस्त बालकाला घेतलं ताब्यात
- अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा परिसरात दुहेरी हत्याकांड; चोर समजून मारहाण करणाऱ्या 20 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली 20 लाखांची खंडणी; दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल