मुंबई Deepak Kesarkar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मतदारांवर विविध योजनांचा पाऊस पाडत आहे. मात्र, यापैकी अनेक योजनांवरून आता वाद होताना दिसतोय. "मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेबाबत आमदार रवी राणांनी वादग्रस्त वक्तव्य केलं "मी तुमचा भाऊ म्हणून शासनाला विनंती करेन की, 1500 रुपये ऐवजी 3 हजार रुपये लाडक्या बहिणींना देण्यात यावेत. पण केव्हा होईल, जेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल. मात्र, जर तुम्ही आशीर्वाद दिले नाही तर, 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेईन". तसंच जे लोक पुढं पुढं करताहेत. त्यांची नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून डिलीट करण्यात येतील, असं मिश्किल वक्तव्य शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार महेश शिंदेंनी केलं. यावरुन राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया येत असताना, आता यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी रवी राणांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
ते पैसे पाठवतात का... - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये रवी राणा हे महिलांना पैसे देतात का? मग पैसे परत घेण्याचा अधिकार त्यांना आहे का, ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणली. या तिघांनाही वाटतंय की, महिलांना कायमस्वरूपी दीड हजार रुपये मिळत राहिले पाहिजेत. पण रवी राणांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याबाबत आज कॅबिनेट बैठक झाल्यानंतर ही आमच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा अन्य योजनेबाबत कोणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये. याबाबत आमची चर्चा झाली. कुठल्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये, असे स्पष्ट निर्देश तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिलेले आहेत.
संपत्ती नको, बाळासाहेबांचे विचार हवेत : मार्मिकच्या वर्धापन दिनी सत्ताधाऱ्यांच्या बुडाखाली मशालीची धग लावली पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. दुसरीकडे काही लोक मार्मिकवर सुद्धा दावा सांगतील, असा चिमटा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी यावेळी काढला होता. त्यावरून केसरकारांना विचारलं असता ते म्हणाले की, सन्माननीय उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. त्यांनी असं बोलणं योग्य नाही. त्यांनी काय बोलावं आणि त्यांच्या टीकेला आम्ही तशाच भाषेत उत्तर देणं. हे आम्हालाही बरं वाटत नाही. दावा करायचाच असता तर पक्षाच्या 50 कोटीवर केला असता. 1 मिनिटात 50 कोटीचा चेक जो मनुष्य लिहून देतो. तुमच्या कुठल्याही संपत्तीवर मला काही रस नाही. आम्हाला फक्त बाळासाहेबांचे विचार हवे आहेत. मला हिंदुत्व हवे आहे, असं तडफदारपणे बोलणाऱ्या आमच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणं अयोग्य असल्याचं केसरकर म्हणाले.
हेही वाचा