छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडं मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पाईगा येथील सरपंच मंगेश साबळे (Mangesh Sable) यांनी फुलंब्री तहसिलदारांची खुर्ची (Phulambri Tehsildar Chair) जाळून 'मराठा समाजाने आक्रमक व्हा' असा संदेश दिला. "लवकरात लवकर आरक्षण द्या, आता अंत पाहू नका. सरकारनं न्याय देण्यास विलंब केल्यास उद्रेक होईल," असा इशारा साबळे यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी याच मंगेश साबळे यांनी स्वत:ची कार पेटवून दिली होती.
आंदोलक आक्रमक : मराठा आंदोलन एका वेगळ्याच दिशेनं जात असल्याचं दिसून येत आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय. तर दुसरीकडं काही आंदोलन मात्र, आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सरपंच असलेल्या मंगेश साबळे या युवा मराठा कार्यकर्त्याने मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची खुर्ची ही पेट्रोल टाकून पेटवून दिली. त्यानंतर मोठ्याने 'एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणाबाजी केली. त्याचबरोबर किती दिवस वाट पाहायची? मराठा समाजानं आता आक्रमक व्हायला पाहिजे," असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं.
आक्रमक आंदोलन केल्याने साबळे आहेत परिचित : अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठी हल्ल्यानंतर राज्यव्यापी बंद पाळण्यात आला होता. त्यावेळी फुलंब्री रस्त्यावर भर चौकात सरपंच मंगेश साबळे यांनी आपली नवीकोरी कार पेट्रोल टाकून पेटवली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदार संघातून मराठा उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरले होते. जवळपास लाखभर मतं त्यांना मिळाली होती. त्यामुळं मंगेश साबळे हे राज्यभर चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर मंगळवारी तहसीलदाराची खुर्ची जाळून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा -