मुंबई Maratha Protest : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदवर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उच्च न्यायालयानं सदावर्ते यांना दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले.
गुणरत्न सदावर्तेंची भूमिका काय : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केला आहे. मुंबईमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक जनता आंदोलनासाठी येईल. यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे राज्य शासनानं हे आंदोलन रोखावं आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं शासनाला आदेश द्यावे, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे ही याचिका दाखल करण्यात आली. मात्र मूळ खंडपीठानं या खटल्याच्या सुनावणीस नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग करण्यात आलंय.
आमरण उपोषणचा इशारा : मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. ते 20 जानेवारीला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईसाठी पायी निघाले. "मी कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार", अशी जरांगेंची भूमिका आहे.
एकनाथ शिंदेंचं आश्वासन : मुंबईच्या वाटेवर असलेले जरांगे सध्या पुण्यात आहेत. त्यांचा हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकेल. दुसरीकडे, जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचालीही वाढल्या आहेत. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करू, पण आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
हे वाचलंत का :