मुंबई Ghatkopar Incident : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याप्रकरणी होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यावर सोमवारी रात्री पंतनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडे याला उदयपूर येथील रिसॉर्टमधून बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी भावेश भिंडेवर अनेक गुन्हे दाखल : आरोपी भावेश भिंडे हा घटना घडल्याच्या रात्री मुलुंड येथील घरातून पळाला. लोणावळा इथं भिंडे पळून आला होता. त्यानंतर चार दिवसांनी गुन्हे शाखेच्या कक्ष 9 नं त्याला अटक केलीय. भावेश भिंडेविरुद्ध जानेवारी 2024 मध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पोलिसांनी भावेश भिंडेविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्याच्याविरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिकेनं अनेक एफआयआर नोंदवले आहेत. तसंच भावेश भिंडे यानं 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकही लढवली होती. यावेळी भावेश भिंडेनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं होतं की, 2009 मध्ये त्याच्यावर रेल्वे पोलिसांकडे 23 गुन्हे दाखल होते. ही सर्व प्रकरणं चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत आहेत. मागील दशकात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी रेल्वे आणि बीएमसीचे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स भिंडे यानं मिळवले होते. यात त्यानं महानगरपालिका आणि रेल्वेच्या अनेक नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचे देखील गुन्हे दाखल आहेत.
होर्डिंग कोसळल्यानं 16 लोकांचा बळी : 13 मे रोजी घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळल्यानं 16 लोकांचा नाहक बळी गेला. त्यामुळं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक भावेश भिंडे याच्यासह अन्य तिघांवर कलम 304 अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी भिंडे गुजू ॲड्स नावाची कंपनी चालवत होता. त्याच्यावर आणि या कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला महापालिकेनं काळ्या यादीत टाकलं होतं. तरीही त्यानं इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी सुरु केली आणि त्याला होर्डिंगचे कंत्राट मिळू लागले.
हेही वाचा :