मुंबई International Women Day : राज्यातील नोंदणीकृत नोंदणीकृत घरकामगारांना पाच हजार रुपयांची मोफत भांडी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सुमारे दहा लाख नोंदणीकृत कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संसारोपयोगी वस्तू कामगारांना वाटप कराव्यात, अशा सूचना उद्योग, ऊर्जा तसंच कामगार विभागानं प्रशासनाला दिल्या आहेत.
तीस भांड्यांचा मिळणार संच : मुंबई, ठाणेसह राज्यभरात कामगार विभागाकडं नोंदणीकृत जवळपास 10 लाख असंघटित कामगार आहेत. या कामगारांना संसारोपयोगी भांडी मोफत दिली जाणार आहेत. जवळपास 30 भांड्यांचा संच प्रत्येक कामगारांना मिळेल. पाच हजार रुपयांपर्यंत ही भांडी असतील. ज्या कामगारांना दोन अपत्यं असतील, अशाच कामगारांना या मोफत वस्तू दिल्या जातील, असं शासन आदेशात नमूद करण्यात आलं आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
साडीनंतर भांडी : संसारोपयोगी भांडी देण्यासाठी कंत्राटदारासोबत करार करण्यात आला आहे. घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या जिल्हा प्रमुखांनी तो तपासणे बंधनकारक आहे. त्या संबधित कागदपत्रांची, व्यक्तीची पडताळणी करून त्यांना तातडीनं संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. वाटप केलेल्या वस्तूच्या खर्चाची माहिती विभाग आयुक्तांना द्यावी लागणार आहे.
तेव्हा केला होता विरोध : महाविकास आघाडी सरकारच्या काळात असंघटित कामगारांना भांडी देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. मात्र, भाजपानं या निर्णयाविरोधात रान उठवलं होतं. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निर्णय रद्द करून भांडी खरेदीचा निधी कामगारांच्या बॅंक खात्यात जमा करावा, अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं केली होती. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय रद्द करून बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा एकदा महायुतीनं भांडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकांसाठी निर्णय : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाला आता काही कामगार संघटनांनी विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारनं केवळ निवडणुकांसाठी हा निर्णय घेतला आहे. सरकारला कामगारांची खरोखरच कळकळ असेल, तर त्यांनी कामगारांचे कंबरडे मोडणारे कायदे रद्द करावेत, कामगारांना त्यांच्या हक्काचं वेतन, पेन्शन, विम्याचं कवच द्यावं, केवळ निवडणुकीपुरती भांडी वाटू नयेत, अशी प्रतिक्रिया कामगार नेते दिलीपदादा जगताप यांनी व्यक्त केली आहे.
हे वाचलंत का :