मुंबई- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज नागपुरात विस्तार झालाय. भाजपाकडून आतापर्यंत पंकजा मुंडे, नितीश राणे, गिरीश महाजन आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळालीय. विशेष म्हणजे महाराष्ट्र बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय. शिवेंद्रराजे भोसले, देवेंद्र भुयार, जयकुमार रावल, मेघना बोर्डीकर आणि मंगलप्रभात लोढा यांनीसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतलीय. मुंबई भाजपाचे अध्यक्ष राहिलेले आशिष शेलार हे तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलेत. तसेच ते बीबीसीआयचे खजिनदारसुद्धा राहिलेत. राष्ट्रीय मिशन ऑलम्पिक समिती सदस्यपद त्यांनी भूषवलंय. तसेच शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे ते माजी मंत्रीसुद्धा राहिलेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माझी अध्यक्ष राहिलेले असून, त्यांचं बीएससी एलएलबीपर्यंत शिक्षण झालंय.
आशिष शेलारांचा राजकीय प्रवास : वर्ष 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 26 हजार 911 मताधिक्याने पहिल्यांदा विजयी झाले, तर वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा 26,550 मताधिक्य राखून विजयी होत आता याच मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक साधलीय. महाराष्ट्र विधान परिषदेवर जुलै 2012 रोजी आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमितभाई शाह आणि तत्कलीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83 जागा मिळवून घवघवीत यश संपादन केलं होतं. या निवडणुकीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत्व केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी 2014 ला महागर्जना रॅली बीकेसीतील मैदानात झाली, त्याचे नियोजनात प्रमुख सहभाग आमदार अॅड आशिष शेलार यांचा होता.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली : मुंबई भाजपाचे अध्यक्ष म्हणून वर्ष 2013 पासून दोन टर्म काम करून त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलीय. विविध उपक्रम, आंदोलने आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे असल्याने भाजपातील एक सर्व समावेशक आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झालीय. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेप्रमाणे "सबका साथ सबका विकास" या धोरणाने पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे पक्षाने मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुन्हा तिसऱ्यांदा त्यांच्यावर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. मुस्लिम, ख्रिश्चन अशा अल्पसंख्याक समाज घटकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत. त्यातून एक सर्वसमावेशक आणि आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
विधान सभेतील उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार : मुंबई भाजपाचे अध्यक्ष तसेच विधान परिषद आणि विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी नागरी चळवळीत आपला विशेष सहभाग नोंदवला. रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर त्यांनी सभागृहातही महाराष्ट्राच्या विविध विषयात अत्यंत अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्या. त्यांना विधान सभेतील उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला. तर संपर्क या सामाजिक संस्थेने सर्वेक्षणात विधानसभेत सर्वात जास्त प्रश्न मांडणाऱ्या आमदारात अॅड आशिष शेलार नंबर 2 वर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर कर्नाटकातील दोन लोकसभा मतदार संघांची निवडणुक जबाबदारी देण्यात आली होती. तर गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर सुरतमधील मतदारसंघांची जबाबदारी पक्षाने सोपविली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या भागात पक्षाला चांगले यश मिळवून देण्यात ते यशस्वी झाले तर हैदराबाद महापालिका निवडणुकीतही त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. तिथेही पक्षाला चांगले यश मिळाले. लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती.
सतत मुंबईकरांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा नेता : मुंबईतील एलफिस्टन येथे रेल्वे पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर संरक्षण मंत्र्यांना भेटून त्यांनी सैन्यदलामार्फत तातडीने पादचारी पूल उभारण्याची संकल्पना मांडली आणि त्यानुसार विक्रमी वेळात हा पूल उभारला गेला. इतिहासात प्रथमच मुंबईत सैन्यदलामार्फत असे काम करण्यात आले. राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री म्हणून त्यांना मिळालेल्या सुमारे सहा महिन्यांच्या कालखंडात त्यांनी 100 निर्णय घेऊन लक्षवेधी काम केले. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांमध्ये लोकप्रिय शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला. सतत मुंबईकरांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारा नेता अशी त्यांची ओळख असून गणेशोत्सव मंडळे, दहिकाला उत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे यांचे वेळोवेळी प्रश्न सोडवून या पारंपरिक उत्सवांची परंपरा टिकली पाहिजे यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढत दिली. त्यांचे बालपण म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेले, त्यामुळे सध्या दुर्दशा झालेल्या या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्याच ठिकाणी रहिवाशांना मोफत घरे मिळाली पाहिजेत, यासाठी त्यांनी पाठपुरावा करून अखेर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात संक्रमण शिबिराच्या पुनर्वसनाचे धोरण तयार करून घेण्यात त्यांना मोठे यश आले. त्याचप्रमाणे कोळीवाडे, गावठाणे यांचा पुर्नविकास व्हावा, त्यांच्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, सिमांकन व्हावे यासाठी ते सतत पाठपुरावा करीत असून आजही हा लढा सुरू आहे. कोविड काळात विधिमंडळाचे अधिवेशन होत नव्हते, त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्यांनी भाजपाचे आमदार, खासदारांच्या वैयक्तिक भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, प्रश्न समजून घेऊन पक्षाकडे त्याचा अहवाल सादर करण्यात त्यांना यश आले.
क्रीडा क्षेत्रातील आशिष शेलारांचं काम : गेली 10 ते 12 वर्षे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रिय असून, विविध समित्यांवर काम तर सुरुवातीला उपाध्यक्ष म्हणून विजयी तर काही काळ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहेत. तसेच वर्ल्डकप 2011 च्या अंतिम सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडीयमच्या पुनर्बांधणीच्या कामात महत्त्वाची जबाबदारी बजावली. तसेच 2016 च्या टी-20 वर्ल्डकप मॅनेजिंग कमिटीचे सदस्य म्हणून काम केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग सुरू करून नवीन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिले. तर गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना संधी देणाऱ्या "स्ट्रीट प्रीमियर लीग" (ISPL) सुरुवात करण्यात पुढाकार घेतला. वांद्रे येथे त्यांनी हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, धनुष्यबाण, बास्केटबॉल, स्केटिंग या खेळासाठी दोन मैदानांचे निर्माण त्यांनी केले. बीसीसीआयच्या मार्केटिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले असून, त्याद्वारे मुंबईतील 250 फुटबॉल क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच राजस्थान स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. दोरी उड्या (Rope Skipping) असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम केले.
साहित्य क्षेत्रातील काम : राजकीय क्षेत्रासोबतच साहित्य वर्तुळातही त्यांनी आपला सहभाग नोंदवला, 20 ते 22 नोव्हेंबर 2015 दरम्यान कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील 16 वे साहित्य संमेलन दादर येथील शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात झाले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद पटकवण्याचा बहुमान त्यांना मिळाला. या संमेलनात स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी मांडलेली भूमिका आणि त्यांचे भाषण साहित्य वर्तुळातही लक्षवेधी ठरले. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार होते. तर पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. 100 वर्षे पूर्ण करणारे वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. वांद्रे पश्चिम येथे ग्रंथाली संस्थेतर्फे मराठी भाषेचे अध्ययन केंद्र सुरू करण्याच्या कार्यात पुढाकार घेतला.
आशिष शेलारांनी भूषविलेली अन्य पदे :
- अभाविप, मुंबई सचिव
- भाजपा, युवा मोर्चा, मुंबई अध्यक्ष
- 1995 भाजपा महाअधिवेशन कार्यकारिणी सदस्य (कोअर टीम)
- मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक, (खार पश्चिम वॉर्ड)
- भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष
- मुंबई महानगरपालिकेत भाजपा नगरसेवकांचे गटनेते
- सुधार समितीचे अध्यक्षपद भूषविले
- सदस्य एमएमआरडीए
- मुंबई मेट्रो हेरिटेज सोसायटीचे गव्हर्नर
- वांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार
- क्षत्रिय गडकरी मराठा महासंघाचे महाराष्ट्र समाज संस्थेमध्ये सक्रिय
अन्य कार्य :
- 2008 साली स्पंदन आर्ट च्या स्थापनेतून काही लघु चित्रपट व चित्रपट निर्मिती
- 26 जुलैच्या मुंबईतील भीषण पूरावर आधारित चित्रपट, ज्याची निवड गोवा फिल्म फेस्टीवल मध्ये करण्यात आली.
- माधव सदाशिव गोलवलकर उर्फ गुरुजी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जीवनावर आधारित तपस्वी लघु चित्रपट.
- मुंबईतील गिरणी कामगारांवर आधारित" डेड चिमणी" हा लघु चित्रपट.
- गेल्या १४ वर्षांपासून मोहम्मद रफी पुरस्काराने संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचा