मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंड करत इतर उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भाजपामधील पदाधिकाऱ्यांवर भाजपाच्या वरिष्ठांनी कारवाई केलीय, यात सात माजी नगरसेवकांसह 16 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. त्यामुळे भाजपाला उशिरा शहाणपण सुचल्याची सर्वत्र चर्चा आहे. नाशिक शहरातील मतदारसंघांमध्ये सर्वाधिक बंडखोरी ही भाजपात झालीय.
माजी नगरसेवकांसह 16 जणांची हकालपट्टी : भाजपाच्या सर्वाधिक नाराजांनी आपल्याच उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करून भाजपाच्या उमेदवारांना चांगलंच जेरीस आणले होते, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विरोधात महापालिकेचे माजी स्थायी समितीचे सभापती गणेश गीतेंनी बंडखोरी करत शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर आव्हान उभे केलंय, याच मतदारसंघातून माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलीय. नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात भाजपाचे महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही बंडखोरी करत मनसेकडून उमेदवारी दाखल केलीय. त्यांच्यासोबत पल्लवी पाटील, इंदुमती नागरे, मधुकर हिंगमिरे, रवींद्र धिवरे यांनीही विरोधी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केलाय, अशात या सर्वांवर भाजपाकडून तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु मतदानाला एक दिवस शिल्लक असताना उशिरा का होईना पक्षाने सात माजी नगरसेवकांसह 16 जणांवर हकालपट्टीची कारवाई केलीय.
वरिष्ठांनी दिले आदेश: नाशकात ज्यांनी ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले अशा सर्वांचा अहवाल आम्ही प्रदेश भाजपाकडे पाठवला होता, त्यानुसार ही कारवाई केल्याचं शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितलंय. माजी नगरसेवक दिनकर पाटील, गणेश गीते, कमलेश बोडके, मधुकर हिंगमिरे, इंदूमती नागरे, पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी निलेश भांदुरे, रुपेश पाटील, विक्रम नागरे, सार्थक नागरे, अनिता सोनवणे, आदित्य पवार, हेमंत आगळे, गणेश काकड, अमोल पाटील यांच्यावर भाजपातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आलीय.
हेही वाचा -