मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागली आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगत असल्याचा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी लगावलाय. मुंबईत टिळक भवनात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. चेन्नीथला म्हणाले की, राज्यात महागाईने उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झालंय. राज्यातील गुंतवणूक, उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नेण्यात आलेत. गुजरात विकासासाठी कार्यरत असलेले हे महाराष्ट्र विरोधी सरकार आहे, असंही रमेश चेन्नीथला म्हणालेत.
बटेंगे तो कटेंगेला भाजपामधूनच विरोध : बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक संस्कृती विरोधात आहे. आता या घोषणेला भाजपामधूनच विरोध होऊ लागलाय. जनतेमध्ये जात, धर्म यांच्या नावावर फूट पाडण्याचे भाजपाचे नेहमीचंच काम आहे. काँग्रेसच्या विरोधामुळे भाजपाला याबाबत आता बॅकफूटवर जावे लागले असल्याचा दावा त्यांनी केलाय. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली, त्यामध्ये ते चार हजार किमी पायी चालले. कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान देशाच्या विविध भागातील सर्व स्तरातील जनतेचा यात सहभाग होता. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे भाजपा घाबरला आहे म्हणून त्यांच्याकडून कसलेही बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाची आपापली धोरणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक बाबतीत खोटे बोलतात, असा आरोप त्यांनी केलाय. मोदी अनेक आरोप करीत असतात, त्यांच्या सर्व आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही, जनतेला वस्तुस्थिती काय आहे हे माहिती आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी दिल्लीहून रिमोट कंट्रोलद्वारे चालणारी नाही. खरं तर महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाची आपापली धोरणे आहेत. आम्ही किमान समान कार्यक्रमाद्वारे वाटचाल करतो. बंडखोरांना साथ देणाऱ्यांविरोधात स्थानिक जिल्हा पातळीवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केलंय. पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांची अवस्था वाईट आहे, त्यामुळे त्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा असल्याचा दावा त्यांनी केलाय.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि नंतर उपमुख्यमंत्रिपद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी अजित पवारांना भ्रष्टाचारी म्हणत होते, नंतर त्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री केले, अशोक चव्हाणांना डीलर म्हणाले, नंतर त्यांचे पक्षात स्वागत केले, या विरोधाभासाकडे रमेश चेन्नीथला यांनी लक्ष वेधले. हे सरकार ईडीचा वापर करून आलेलं आहे. भाजपाने संविधान बदलण्याचा प्रयत्न केला त्यांना जनतेने नाकारले. संविधानाची सुरक्षा करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे, मोदींनी संविधान वाचलेलं नाही, त्यांनी संविधान वाचण्याची गरज आहे, असे चेन्नीथला म्हणालेत.
हेही वाचा-