छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत काही मतदार संघाचे निकाल धक्कादायक लागले ते राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळं. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजानं एकमुखानं पाठिंबा दिला, त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीत देखील त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असं चित्र आहे. त्यात आता सर्व मतदार संघात अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्यानं कन्नड तालुक्यात मराठा उमेदवारानं पहिला अर्ज दाखल केलाय. मनोज पवार या जरांगे समर्थकानं विधानसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली असून त्यांच्या भुमिकेनुसार पुढील निर्णय घेऊ, असं मनोज पवार यांनी सांगितलं.
मनोज जरांगे यांनी घेतली भूमिका : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक होण्याआधी प्रश्न सोडावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. मात्र आचारसंहिता लागली तरी सरकारनं आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळं अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक झाली त्यात निवडणूक लढवण्याबाबत विचार विनिमय घेण्यात आला. त्यानुसार कोणाला पाडायचं किंवा कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. गुरुवारी त्यांनी बैठक घेऊन सर्वच ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावे अशा सूचना दिल्या. पुढील भूमिका 29 ऑक्टोबर रोजी घेऊ, असंही त्यांनी सांगितल्यानं राज्यात अनेक मतदार संघात मराठा आंदोलकांनी अपक्ष अर्ज केलेत.
जिल्ह्यातील पहिला अर्ज कन्नड तालुक्यात : मनोज जरांगे पाटील यांनी सूचना दिल्यावर जिल्ह्यातील कन्नड मतदार संघात मनोज पवार या मराठा कार्यकर्त्यानं शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. "गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा लढत असून, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. आंदोलन, मोर्चे उपोषण केलं असून आता समाजाला न्याय देण्यासाठी विधानसभा निवडणूक निर्णायक असणार असल्यानं अर्ज भरला आहे. जरांगे पाटील पाटील यांच्याकडे जाऊन अर्ज केला आहे. प्राथमिक चर्चा झाली असून त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार पुढील वाटचाल करू," असं मत मराठा आंदोलक उमेदवार मनोज पवार यांनी व्यक्त केलं.
अनेक उमेदवारांनी दिल्या मुलाखती : मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यात आल्यानंतर देखील सरकारनं कुठलाही प्रकारचं आश्वासन दिलं नाही. ओबीसीमधून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू केला. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नसले तरी, त्यांनी खेळलेली रणनीती सत्ताधाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. विधानसभा निवडणुकीत आता मराठा समाजाचा कार्यकर्ता विधानभवनात गेला, तर समाजाला न्याय मिळू शकेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्यानुसार निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. त्यामुळं आंदोलनात सक्रिय असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज केले आहे. त्यातील काही लोकांनी अर्ज घेतले असून लवकरच हे अर्ज ते निवडणूक विभागाकडे सादर करणार आहेत. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक निषेध रंगतदार ठरणार हे नक्की.
हेही वाचा