मुंबई - विधानसभा निवडणूक मतदानाला अवघे काही तास बाकी असताना आणि सोमवारी 6 वाजल्यानंतर प्रचार संपला असताना आता मुंबई उपनगरातून निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर येतेय. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. हितेंद्र ठाकूर यांच्या या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, सर्व पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनी आज (मंगळवारी) तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील भ्रष्ट सरकारवर सडकून टीका केलीय.
भ्रष्ट राजवट नष्ट व्हावी : उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर सांगितलं की, "मी राज्यातील शेतकऱ्यांना.., सामान्य लोकांना चांगले दिवस यावेत, राज्यात एक चांगलं शासन यावे, यासाठी तुळजाभवानीकडे साकडं घातलंय". त्यानंतर विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा प्रकार घडलाय, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, कालच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. यानंतर विनोद तावडे पैसे वाटतात, हे मी तुमच्याकडूनच ऐकतोय. त्यामुळं राज्यातील ही भ्रष्ट राजवट खत्म व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असं साकडं मी तुळजाभवानीकडे घातल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
बविआचे आरोप बिनबुडाचे : दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केल्यानंतर यावरून सत्ताधारी-विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर येताहेत. भाजपाचा एक राष्ट्रीय सचिव 5 कोटी रुपये मतदारांना कसे काय वाटू शकतो? हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. आमच्या विरोधात लोकसभेमध्ये एक नरेटिव्ह सेट केला होता. आताही विरोधक एक वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करतायत. नालासोपारामधील या प्रकारावरून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलीय. म्हणून निवडणुकीत काही करता येईल का? आपल्या बाजूने वातावरण निर्माण करता येईल का? त्याच्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केलाय.
तोपर्यंत सोडणार नाही : विनोद तावडे हे पाच कोटी रुपये वाटत होते. पैसे वाटल्याचे हॉटेलमधील सीसीटीव्ही समोर येत नाहीत आणि जोपर्यंत विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही हॉटेलमधून निघणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांनी घेतलीय. तसेच बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना हॉटेलमध्ये गराडा घातलाय. सध्या हॉटेलबाहेर तणावाचे वातावरण असून, सीसीटीव्ही आणि गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलीय.
हेही वाचा -