मुंबई Vijay Wadettiwar : मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. "देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत मराठा समाजाला आरक्षण भेटू नये, यासाठी एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यावरून आता राज्यात राजकारण सुरू झाल्याचं दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी," अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईत ते बोलत होते.
त्यांचा जो डाव होता, तो डाव फसला : याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबरोबर ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या सरकारनं केलं. एकानं जरांगे यांचं आंदोलनाल हाताळायचं तर, दुसऱ्यांन ओबीसी समाजाला हाताळायचं. दोन समाजात भांडण लावण्याचं पाप या सरकारनं केले. मराठा समाजासाठी जो 10 टक्के आरक्षणाचा जीआर काढला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की, आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं. परंतु त्याबरोबर आम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण सुद्धा काढलं नाही. म्हणजे दोन्ही समाजानं आम्हाला मतदान करायचं. परंतु हा त्यांचा डाव फसला. यामध्ये ते अपयशी झाले, त्याचंच हे फलित असल्याचं ते म्हणाले. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत असतील, तर त्या मागची भूमिका त्यांना माहित असावी. कारण आम्ही काही त्यांच्याबरोबर नाही आहोत. त्यांनी केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. कारण ही बाब गंभीर आहे."
जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न : विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, "या आंदोलनामुळं मराठा समाजात निराशा पसरली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन संपविण्याच्या प्रयत्नांना सरकारकडून होत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम सरकारनं सुरू केलं आहे," असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. "जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी होतं. ते खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न. जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न होत आहे."
राज्याचा कारभार फडणवीस चालवतात : मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मला मारण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस, तुम्ही माझा बळी घेतला तरी, मी खोटे आरोप सहन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे, तर देवेंद्र फडवणीस राज्याचा कारभार चालवत आहेत, असेही ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष फोडण्याचं कामही फडणवीस यांनी केलं. माझ्या उपोषणामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा दौरे रद्द झाल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
हे वाचलंत का :