मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सकाळपासून नेत्यांची भलीमोठी रीघ लागलीय. याप्रसंगी येथे उपस्थित असलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधलाय. जे आपल्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये दिवे लावू शकले नाहीत, ते दुसऱ्याच्या मतदारसंघांमध्ये काय दिवे लावणार? असा टोलासुद्धा नवनीत राणा यांनी बच्चू कडूंना लगावलाय.
माझी औकात काढणाऱ्यांना त्यांची जागा दिसेल : याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, मी एका माजी सैनिकाची मुलगी असून, माझी औकात बरेच लोक काढत आहेत. बच्चू कडू यांनीसुद्धा माझी औकात काढली. मी वयाने आणि अनुभवानेसुद्धा लहान आहे. परंतु माझी आणि माजी सैनिकाच्या परिवाराची औकात काढणाऱ्या बच्चू कडू यांना यंदा जनतेने त्यांची जागा दाखवून दिलीय, असे प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना दिलंय. तसेच जे स्वतःच्या मतदारसंघांमध्ये दिवे लावू शकले नाहीत, ते दुसऱ्यांच्या मतदारसंघात काय दिवे लावणार? अशी टीकाही नवनीत राणा यांनी केलीय.
संजय राऊतांची दिशाही बदलेल : संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंय. या विषयावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, मी वेळेसोबत अनेक लोकांना बदलताना पाहिलंय. परंतु संजय राऊत सारखे लोकसुद्धा बदलू शकतात, हे मी पहिल्यांदाच बघत आहे. संजय राऊत यांचा सूरच नाही, तर त्यांची दिशाही लवकर बदलेल, असा खोचक टोलाही नवनीत राणा यांनी लगावलाय. महाराष्ट्रातील जनतेचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. कुणी किती काही म्हटले तरी सुद्धा बाळासाहेबांचे नाव घेणे आणि आमचे विचार आमच्या तोडून कधीच बंद होऊ शकत नाही. जेव्हा लोक म्हणायचे की, राम हे भाजपाचे नसून संपूर्ण देशाचे आहेत. त्याप्रमाणे बाळासाहेबांचे विचारसुद्धा एका परिवाराचे नसून ते संपूर्ण राज्याचे आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्यात.
हेही वाचा :