पुणे Koyta Gang Attack On Police : पुण्यातील कोयता गँगनं सहायक पोलीस निरिक्षकावरच कोयत्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात सहायक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं? : हडपसर नजिक वानवडी परिसरात दोन दुचाकी चालकांमध्ये चालू असलेल्या भांडणात, भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सहायक पोलीस निरीक्षकावर गुंडांनी कोयत्यानं हल्ला केला. हातातून कोयता घेत असताना तो कोयता फेकून डोक्यात मारल्यानं मध्यस्थी करणारे सहायक पोलीस निरीक्षक रक्तबंबाळ झाल्यानं आजूबाजूच्या परिसरात पूर्णतः गोंधळ उडाल्याचं दिसून आलं. त्या गोंधळात मारहाण करणारे दोन गुंड पसार झाले आहेत. तर घटनेत सहायक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं शहर पोलीस दलात खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं. तसंच पोलीस असताना देखील त्यांच्यावर हल्ला झाल्यानं पुण्यात कोयता गँगचा गुंडाराज सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
आरोपींचा शोध सुरू : सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड (वय 36) असं जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. निहालसिंग मन्नूसिंह टाक आणि त्याचा साथीदार राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड अशी फरार झालेल्या आरोपींची नावं असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेसंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना पुणे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितलं की, "घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रत्नदीप गायकवाड यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे."
हेही वाचा -
- दुचाकीवर चिखल उडाल्यानं वाद; ज्येष्ठ नागरिकाकडून महिलेला बेदम मारहाण, आरोपी अटकेत - Woman Beaten Pune
- दारुड्याचा पोलीस ठाण्यात धुडगूस; महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न - Pune Crime News
- "ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलीस मास्टर माईंडपर्यंत पोहचणार नाहीत,कारण..."- आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप - Pune Drugs News