कोल्हापूर Kolhapur Crime : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यानं आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला करत डोके फोडल्याचा धक्कादायक प्रकार करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले सीएसकेचे चाहते बंडोपंत बापूसो तिबिले (63) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बळवंत महादेव झांजगे (50) आणि सागर सदाशिव झांजगे (35) यांना करवीर पोलिसांनी अटक केलीय.
मुंबई इंडियन्स चाहत्यानं सीएसकेच्या चाहत्याचे फोडले डोके : भारतात आयपीएलची क्रेझ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेषतः सर्वाधिक यशस्वी राहिलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन टीमचे समर्थक भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. दोन्ही संघाचे समर्थक एकमेकांकडे कट्टर विरोधक म्हणून पाहत असतात. बुधवारी रात्री मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू होता. या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथील मुंबई इंडियन्सचे समर्थक बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसोबत गल्लीतील शिवाजी गायकवाड यांच्या घरात आयपीएलचा सामना पाहत होते.
प्रकृती होती चिंताजनक- सामन्यात हैदराबादनं मुंबई इंडियन्स समोर मोठा धावांचा डोंगर उभा केल्यानं ते रागात होते. याचवेळी चेन्नई सुपर किंगचे समर्थक बंडोपंत तिबिले तिथं पोहोचले. काही वेळात रोहित शर्माची विकेट पडली. यावेळी बंडोपंत तिबिले म्हणाले, " रोहित शर्मा गेल्यानं मुंबई इंडियन्सला सामना जिंकता येणार नाही." ते चेन्नई सुपर किंगचं कौतुक करू लागले. यामुळं बळवंत झांजगे आणि सागर झांजगे यांना राग अनावर झाला. त्यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीनं मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्यानं जागीच बेशुद्ध पडले. येथील नागरिकांनी तिबिले यांच्यावर खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केले. त्यांच्यावर दुसऱ्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई इंडियन्सचे दोन्ही चाहते पोलिसांच्या ताब्यात : या घटनेनंतर बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले (48) यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली होती. या घटनेचा घटनाक्रम आणि वादाचं कारण एकून पोलीसदेखील चक्रावले होते. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बळवंत महादेव झांजगे आणि सागर सदाशिव झांजगे या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय.
हेही वाचा :