मुंबई India First Voters Ballot Box : लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकीकरिता मतदान खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी मतपेटीचा वापर करण्यात आला. या मतपेटीचे उत्पादन मुंबईत झाले.
भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 1950 मध्ये भारतीय राज्यघटना अंमलात आणण्यात आली. त्यानंतर 1952 मध्ये देशातील पहिली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक लढवण्यात आली. ही निवडणूक पहिलीच असल्यानं त्यासाठी लागणाऱ्या मतपेट्या हा महत्त्वाचा मुद्दा होता. निवडणूक घोषित झाल्यानंतर केवळ चार महिने शिल्लक राहिल्यानं, अत्यंत कमी कालावधीत मतपेट्या तयार करण्याचं आव्हान होतं. त्यामुळं हे जोखमीचं काम त्यावेळी लोखंडी पेट्या तयार करण्यात अतिशय प्रसिद्ध असलेल्या 'गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग' कंपनीला देण्यात आलं.
मतपेटीच्या रचनेचं आव्हान : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात येणारी मतपेटी ही मजबूत तर असायलाच हवी होती, त्यासोबत ती किफायतशीर सुद्धा असणं गरजेचं होतं. या मतभेटीमध्ये पाणी जाऊ नये आणि त्या हवाबंद असाव्यात, असा उद्देश होता. यासंदर्भात बोलताना गोदरेजच्या पुरातत्व प्रमुख वृंदा पाठारे म्हणाल्या की, "त्यावेळी केवळ पाच रुपयाला एक मतपेटी तयार करण्यात आली. मतपेटी तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य असणं गरजेचं होतं. त्यामुळं अशी मतपेटी तयार करण्यापूर्वी विविध 50 मतपेट्या पेक्षा जास्त मतपेट्यांचे नमुने तयार करण्यात आले. मतपेटीला बाहेरून लावण्यात येणाऱ्या कुलुपाची किंमत ही मतपेटीच्या उत्पादनाच्या किमतीपेक्षा जास्त होती. त्यावेळी गोदरेजमधील तत्कालीन कामगार नाथालाल पांचाल यांनी एक अंतर्गत कुलूपाची प्रणाली तयार करण्याचं सुचवलं. त्यानुसार एक ब्ल्यू प्रिंट बनवण्यात आली. ही ब्लू प्रिंट लालबाग येथील एका जुन्या कारखान्यात तयार करायला दिली. गोदरेजच्या कामगारांनी रात्रंदिवस तीन पाळ्यांमध्ये काम करून दिवसाला सुमारे पंधराशे मत पेट्या तयार केल्या. या मतपेट्या विक्रोळी येथील गोदरेजच्या कारखान्यातून भारतातील 23 राज्यांमध्ये रेल्वेद्वारे पोहोचवण्यात आल्या."
बारा लाख मतपेट्यांची निर्मिती : "सध्या देशभरात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतलं जातं. मात्र, तंत्रज्ञान अध्यायावत होण्यापूर्वी बॅलेट पेपरद्वारे मतदान होत होतं. आताही अनेक नागरिकांकडून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचीच मागणी होत आहे. मात्र, असं असलं तरी त्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतपेट्या तयार करण्याचं आव्हान गोदरेजने पेललं," असे पाठारे यांनी सांगितलं. " पोलादाच्या 12 लाख 83 हजार मतपेट्या तयार करण्यात आल्या होत्या. मतपेटी वजनाने जरी थोडी जड असली तरी ती अत्यंत सुरक्षित आणि अंतर्गत कुलूप प्रणालीनं सज्ज अशी होती. त्यामुळं मतपेट्या फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सहजासहजी यश येणार नव्हतं. ही गोदरेज कंपनीसाठी केवळ एक व्यावसायिक ऑर्डर नव्हती, तर राष्ट्र उभारणीच्या अभूतपूर्व कार्यात सहभाग घेण्याची मोठी संधी होती. त्यात गोदरेजनं विश्वासाच्या कसोटीवर उतरून आपलं काम पूर्ण केल्याचा आजही व्यवस्थापनाला अभिमान आहे," असंही पाठारे म्हणाल्या.
हेही वाचा -