मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. बुलडाणा इथले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ते बुलडाण्याचे आमदार असा त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वाढता आलेख आहे. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकून त्यांच्या कार्याची पावती दिली आहे.
![Harshvardhan Sapkal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-02-2025/whatsapp-image-2025-02-13-at-65743-pm_1302newsroom_1739454305_161.jpeg)
कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ : हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म 10 जानेवारी 1968 साली झाला. उच्चशिक्षित आणि प्रचंड अभ्यासू नेता अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी चांगलं काम केल्याची ख्याती आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली. 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये त्यांनी काम केलं. 2014 साली पहिल्यांदाच बुलडाण्यातून काँग्रेसचे ते आमदार झाले. 2019 मध्ये त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिलं, मात्र त्यांचा पराभव झाला. हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठं काम केलं आहे. त्यांचं राज्यातलं काम पाहून राहुल गांधी यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लिन इमेज असल्याचं काँग्रेस पक्षात बोललं जाते. ग्रामीण भागात काम, काँग्रेस पक्षाशी निष्ठावंत असलेला हार्डकोअर कार्यकर्ता, अशी त्यांची पक्षात ख्याती आहे. मध्यंतरी त्यांना भाजपा पक्षात प्रवेश करण्याच्या ऑफर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र काँग्रेसच्या विचारसरणीवर ते ठाम राहिले.
हर्षवर्धन सपकाळ हे सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष : विद्यार्थी दशेपासूनचं हर्षवर्धन सपकाळ हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (NSUI) च्या ते माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी कॉम आणि बी पीएड पदवी धारण केली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिलं आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण क्षेत्रातील त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. युवक शिबिरांच्या आयोजनातून त्यांनी तरुणांचं संघटन उभं केलं. शेतीस्वावलंबनासाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन आणि जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केलं. आदिवासी तथा आदिवासी गावांचं सक्षमीकरण करण्यासाठी मागील 25 वर्षांपासून ते सातत्यानं प्रयत्नशील आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलडाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती. 2014 ते 2019 या कालावधीत ते बुलढाणा विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले.
कर्जमाफीसाठी झालं होतं हर्षवर्धन सपकाळांचं निलंबन : नाना पटोले देखील विदर्भातीलच होते, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद विदर्भातील नेत्याकडं कायम राहिलं आहे. गेल्या विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेते पदी काम केलं. त्यांची आता विधिमंडळ पक्षनेते पदी निवड करण्यात आली. 2017 मध्ये तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करत होते. यावेळी बुलडाणा विधानसभेचे आमदार असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला. त्यावेळी कर्जमाफी न होता गोंधळ केल्याच्या आरोपावरुन इतर आमदारांसोबत सपकाळ यांना देखील निलंबित करण्यात आलं. तत्कालिन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्या प्रस्तावाला मंजूरी दिली. नंतर काही कालावधीनंतर त्यांचं निलंबन मागं घेण्यात आलं. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी सपकाळ यांच्या नियुक्तीचं स्वागत केलं. पक्षाला आक्रमक स्वरुप देऊन तळागाळापर्यंत पोहोचवण्यात सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली यश मिळेल, असा विश्वास हकीम यांनी व्यक्त केला.
विधिमंडळ पक्षनेते पदी विजय वडेट्टीवार : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद व पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते पद ही दोन्ही महत्त्वाची पदं यावेळी काँग्रेसनं विदर्भातील नेत्यांकडं सोपवली आहेत. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला होता तेव्हापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा सुरु झाल्या होत्या. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी या निवडीत धक्का देत चर्चेत नसलेल्या सपकाळ यांना या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्त केलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के सी वेणुगोपाल यांनी सपकाळ आणि वडेट्टीवार यांच्या निवडीचं पत्र जाहीर केलं.
हर्षवर्धन सपकाळ यांचं राजकीय क्षेत्रातील योगदान :
- विद्यामान राष्ट्रीय अध्यक्ष : राजीव गांधी पंचायत राज संगठन
- पक्ष निरिक्षक : ओडिसा लोकसभा/विधानसभा 2024
- राष्ट्रीय सचिव : अखिल भारतीय काँग्रेस कमेटी नवी दिल्ली- सह प्रभारी गुजरात- मध्यप्रदेश - पंजाब (दहा वर्ष)
- राष्ट्रीय उपाध्यक्ष : राजीव गांधी पंचायत राज संगठन
- माजी अध्यक्ष : जिल्हा परिषद बुलडाणा (1999 ते 2002)
- माजी आमदार : बुलडाणा विधानसभा मतदार संघ (2014 ते 2019)
- माजी सदस्य : जिल्हा परिषद बुलडाणा (1997 से 2006)
- शिबिर समन्वयक : गांधी विचार दर्शन सेवाग्राम (अ.भा.काँ.कमिटी द्वारा आयोजन)
- माजी उपाध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
हेही वाचा :