कोल्हापूर Kagal Drowned Case : वेदगंगा नदीत बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह स्थानिकांच्या मदतीनं पाण्याबाहेर काढण्यात आले तर आणखी एक मृतदेह शोधण्याचं काम बचाव पथकाकडून सुरू होतं. या घटनेची नोंद कागल पोलिसात करण्यात आली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले : आणुर ता. कागल गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते. आज दुपारी तीनच्या सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांना पाण्याचा अंदाज न आल्याने यातील सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येळमल्ले या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमल्ले पाण्यात उतरले मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने चौघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबतची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. यावेळी दोन महिलांसह एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश मिळालं; मात्र यश दिलीप येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे.
पालकमंत्र्यांच्या सूचना : दुपारी तीनच्या सुमाराला घडलेल्या या दुर्घटनेची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली. मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या परदेश दौऱ्यावर असून स्पेनमधून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि तहसीलदार अमर वाकडे यांच्याशी संपर्क साधला. चौथा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पोलीस घटनास्थळी दाखल : कागल तालुक्यातील आनूर-बस्तवडे बंधारा येथे चौघेजण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्याबाहेर काढलेले मृतदेह कागल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा:
- पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीनं प्रायव्हेट पार्टला लावलं खिळ्यानं छिद्र पाडून कुलूप, पिंपरी चिंचवडमधील भयानक प्रकार - inhuman act with wife
- गिरीश महाजन यांच्याकडं लोण्याचं मडकं, कुठं लोणी लावतात सांगणार नाही; वडेट्टीवारांची महाजनांवर टीका - Vijay Wadettiwar
- हिंदुत्वाचा विचार आहे, तर भाजपा, संघाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत या; ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरेंची भावनिक साद - Uddhav Thackarey