मुंबई FIR In Stray Dog Died Case : गोरेगाव इथल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या श्वानांचा मृत्यू झाला आहे. उपासमारीमुळे या श्वानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी नेस्को एक्झिबिशन सेंटरची महिला अधिकारी तसेच सुरक्षा रक्षकाविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांनी सांगितलं आहे.
भटक्या श्वानांना खायला घालण्यास मज्जाव : प्राणी प्रेमींना नेस्को सेंटरमधील भटक्या श्वानांना खायला घालण्यास आरोपी मज्जाव करत होते. आत सोडण्याची विनंती केली असता, प्राणी प्रेमींना धमकावण्यात आलं होतं, अशी माहिती पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांना मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक कुडाळकर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी प्राण्यांच्या मदतीसाठी पाल नावाची संस्था सुरू केली आहे.
नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या श्वानांचा मृत्यू : पाल लीगल टीम संस्थेचे सदस्य आणि सल्लागार रोशन पाठक यांनी नेस्को प्राधिकरणाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिथं पाळलेल्या श्वानांचा मृत्यू झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. वनराई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेनं आरोप केला आहे की, "मिनी आणि सुरक्षा रक्षक मौर्य नावाच्या व्यक्तीनं व्यवस्थापनात काम करत असताना नेस्को कंपाऊंडमध्ये उपस्थित असलेल्या श्वानांना खायला देण्यापासून रोखलं. परिणामी 26 श्वानांचा मृत्यू झाला. याची माहिती पाल संस्थेच्या कायदेशीर टीमचे सदस्य रोशन पाठक यांनी दिली. संबंधित प्रकरणाची दखल घेत त्यांनी वनराई पोलीस स्टेशन गाठलं. प्रकरणातील कायदेशीर मुद्दे समजावून सांगितल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला."
वनराई पोलिसांनी दाखल केला गुन्हा : वनराई पोलिसांनी मिनी आणि मोर्या यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 325, 351(2) आणि प्राणी संरक्षण कायद्याच्या 11 (1) (1) अंतर्गत वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "एक महिला श्वानांना खायला देण्यासाठी नेस्कोमध्ये जात असे. मात्र तिला नेस्कोमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे श्वानांचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्राणी मित्र संघटना : बोरिवलीतील एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुधीर कुडाळकर हे प्राणी प्रेमी असून त्यांनी भटक्या मांजरी आणि श्वानांच्या सुरक्षेसाठी वसा घेतला आहे. कोरोना काळात कुडाळकर यांनी १५० वर्षे वयाच्या कासवाची सुटका केली. त्यांच्या या कार्याचा गौरव प्राणीमित्र संघटना पेटा, एडब्ल्यूबी, पोलीस खाते आणि महाराष्ट्र सरकारनेही केला होता. सुधीर कुडाळकर यांनी पाल नावाची प्राणी मित्र संघटना देखील सुरू केली असून मुंबईतील पश्चिम उपनगरात प्राण्यांवरील अत्याचारा विरोधात आवाज उठवण्याचे काम ही संघटना करते.
हेही वाचा :